केंद्रीय रेल्वे समिती सदस्यांच्या मागणीला यश.
प्रवाशांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य – खा. संजय दिना पाटील
मुंबई, दि. १८ – रेल्वे प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत व उपचार मिळावे यासाठी मध्य मुंबईतील १८ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. तर सध्या १० स्थानकांसाठी ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित आठ स्थानकांसाठी लवकरच प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्रीय रेल्वे समितीचे सल्लागार सदस्य, खासदार संजय दिना पाटील यांच्या या मागणीला यश आले असून यासाठी त्यांनी वारंवार मुंबई तसेच केंद्रीय रेल्वे प्रशासनाशी पाठपुरवठा केला होता.
रेल्वे प्रवाशांना अपघातानंतर वैद्यकीय मदत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे आल्या होत्या. अनेक रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहीका उपलब्ध नव्हत्या तर वैद्यकीय कक्ष केवल चार रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी अपघात झाल्यास त्यांना वैद्यकीय मदत मिळे पर्यंत जखमींना आपला जीव गमवावा लागत असे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय कक्ष सुरु करावे, डॉक्टर, कर्मचा-यांची नियुक्ती करावी, जीवन प्रणाली यंत्रणा तसेच प्रत्येक रेल्वे स्थानकावर रुग्णवाहीका उपलब्ध करुन द्यावी. गर्दीच्या वेळेस सर्व रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची नियुक्ती करावी. या मागण्या केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, खासदार संजय दिना पाटील यांनी मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरवठा केला होता. शिवाय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत ही हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यांच्या या मागणीला यश आले असून लवकरच मध्य रेल्वेच्या १८ स्थानकांवर वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मध्य व हार्बर मार्गावरील ९० पैकी फक्त चार स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध आहे.ML/ML/MS