रेल्वे अपघातांना केंद्र सरकार जबाबदार, निष्पाप लोकांचे जातात बळी – खा. संजय दिना पाटील
मुंबई, दि. ३ – बदलापुर येथे रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणीला जीव गमवावा लागला तर सायन येथे गर्दीमुळे तीनजण ट्रेनबाहेर पडल्याने गंभीर जखमी झाले तर मालाड येथे रेल्वेतून उतरण्यावरुन झालेल्या वादात अलोक सिंग या प्राध्यापकाचा खुन करण्यात आला. या सर्व घटना पाहता रेल्वेतील वाढत्या गर्दीमुळे होत असून याला पर्याय म्हणुन काही सुचना केंद्रिय रेल्वे मंत्रालयाला करण्यात आल्या होत्या. मात्र या सुचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा आरोप ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खा. संजय दिना पाटील यांनी केला आहे.
मुंबईतील वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी विद्याविहार येथून दर १५ मिनिटाला एक ट्रेन सोडण्यात यावी. महिला विशेष गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात यावी व सीएसएमटी येथून कर्जत-कसारा या ठिकाणी जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात याव्यात. या व इतर मागण्या खा. संजय दिना पाटील यांनी केल्या होत्या. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र या सर्व मागण्याकडे दुलर्क्ष करीत असल्याने परिणामी अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. या सर्व घटनांना केंद्र सरकार जबाबदार असून त्यांना प्रवाशांच्या जीवाची काळजी नसल्याचे दिसून येत आहे. अन्यथा त्यांनी या मागण्यावर विचार करुन कार्यवाही केली असती. असा आरोप खा. संजय दिना पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, या सर्व मागण्यांवर पुन्हा एकदा विचार करुन त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. विलंबाने धावणा-या गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्यात यावे. एसी गाड्यांमुळे इतर गाड्यांच्या गर्दीवर ताण येत आहे. त्यामुळे एसी गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा करावी. सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारे एसी गाड्यांच्या तिकीट व मासिक पास दरात सवलत दिल्यास जास्त प्रवासी एसी लोकलने प्रवास करतील. यामुळे गर्दी कमी होईल व रेल्वेच्या उत्पनात वाढ होईल. यावर प्रामुख्याने विचार करण्याची मागणी खा. संजय दिना पाटील यांनी केली आहे. तसेच दर तीन मिनिटाला एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर येणे गरजेचे आहे. सायंकाळी ४ ते ११ या गर्दीच्या वेळेत सीएसएमटी ते दिवा व सकाळी ६ ते ११ दिवा ते सीएसएमटी ट्रेन सोडण्यात याव्यात. त्याच प्रमाणे गर्दीला आवर घालण्यासाठी आरपीएफ जवानांची संख्या वाढविण्यात यावी. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वैद्यकीय व रुग्णवाहिकेची सुविधा देण्यात यावी, या व इतर मागण्या ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केल्या आहेत.ML/ML/MS