तिबेटी धर्मगुरू दलाई लामा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानीत
लॉस एंजेलिस, दि. २ : तिबेटी धर्मगुरू आणि जागतिक स्तरावर शांततेचा संदेश देणारे दलाई लामा यांना त्यांच्या Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama’ या ऑडिओबुकसाठी 2026 च्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ९० व्या वर्षी त्यांनी प्रथमच हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून इतिहास रचला.
दलाई लामा यांना लॉस एंजेलिस येथे झालेल्या ६८व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात “Best Audiobook, Narration, and Storytelling Recording” या विभागात विजेतेपद मिळाले. त्यांच्या ‘Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama’ या ऑडिओबुकमध्ये अध्यात्म, करुणा, पर्यावरणाची काळजी आणि मानवतेची एकता यांचा संदेश दिला आहे. या ऑडिओबुकमध्ये हिंदुस्थानी संगीताच्या छटा आणि त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब एकत्रितपणे सादर करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी दलाई लामांच्या ऑडिओबुकने Trevor Noah, Ketanji Brown Jackson, Kathy Garver आणि Fab Morvan यांच्या नामांकित कृतींना मागे टाकले. पुरस्कार स्वीकारताना दलाई लामांनी संदेश दिला की, “हा सन्मान मी वैयक्तिक मानत नाही, तर तो आपल्या सर्वांच्या सार्वत्रिक जबाबदारीचा गौरव आहे. शांतता, करुणा, पर्यावरणाची काळजी आणि मानवतेची एकता हीच खरी गरज आहे.”
दलाई लामांनी यापूर्वी १९८९ मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. आता ग्रॅमी पुरस्काराने त्यांचा अध्यात्मिक संदेश संगीत आणि कथनाच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याची नवी दारे उघडली आहेत. ९० व्या वर्षी मिळालेला हा सन्मान त्यांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
या विजयामुळे दलाई लामांचा शांतता आणि करुणेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल, तसेच अध्यात्मिक विचारांना जागतिक सांस्कृतिक मंचावर नवे स्थान मिळेल.
SL/ML/SL