मोहम्मद अली मार्ग आणि इब्राहिम मर्चंट मार्गावरील अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील वाढीव बांधकामांचे निष्कासन*
मुंबई, 2
अत्यंत गजबजलेले व्यापारी रस्ते म्हणून ओळखल्या जाणा-या मोहम्मद अली मार्ग आणि इब्राहिम मर्चंट मार्ग परिसरातील पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभागाकडून आज (दिनांक २ फेब्रुवारी २०२६) निष्कासन करण्यात आले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार, उप आयुक्त (परिमंडळ-१) श्रीमती चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (बी विभाग) श्री. योगेश देसाई यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
मोहम्मद अली मार्ग हा भेंडीबाजार, मशीद बंदर आणि भायखळा परिसराला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. इब्राहिम मर्चंट मार्ग हा रस्ता नागदेवी आणि मांडवी परिसराच्या जवळ आहे. हे दोन्ही रस्ते व्यापारी दृष्टीने आणि रहदारीच्या दृष्टिने खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्ही मार्गावरील पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे आढळून आली होती. तसेच, या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे, वाहनचालकांना मार्गक्रमण करण्यास तसेच पादचाऱयांना पदपथांवर चालण्यास अडथळा निर्माण होत होता.
या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभागाकडून निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत, या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. ७ अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. तसेच, १२ ओटे, पत्र्याचे लोखंडी शेड, १० बोलार्ड, २ बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलनाची ०४ वाहने, ०२ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे निष्कासन करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ४० अधिकारी – कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.
या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळातही अनधिकृत / वाढीव बांधकामांविरोधात नियमितपणे निष्कासनाची कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.KK/ML/MS