कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची प्रगती

 कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची प्रगती

मुंबई, 1
जगातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनांपैकी मुंबईची पाणीपुरवठा व्यवस्था अग्रगण्य मानली जाते. पाणीपुरवठ्यासाठी जलबोगद्यांचे बांधकाम करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सुमारे १०० किलोमीटर लांबीचे जलबोगदे असलेले मुंबई महानगर हे जगातील दुसरे शहर ठरते. जलवितरण व्यवस्थेतील एक व्यवहार्य व प्रभावी पर्याय म्हणून जलबोगद्यांचा वापर केला जात आहे. जलबोगद्यांद्वारे पाणी वहन केल्यामुळे गळती तसेच वितरणातील अपव्यय यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येत आहे, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी केले.

कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान पाणी वहन करण्यासाठी जलबोगद्याचा आराखडा व बांधकामाची कामे सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी मुलुंड जकात नाका प्रकल्प कार्यस्थळास भेट देऊन पाहणी केली.

उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) श्री. पुरूषोत्‍तम माळवदे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्‍प) श्री. महेंद्र उबाळे यांच्‍यासह संबंधित अभियंते, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी म्हणाले की, भातसा या जलस्त्रोताचे पाणी हे मुंबई-II आणि मुंबई -III या दोन मुख्य जलवाहिन्यांद्वारे मुंबई महानगरापर्यंत आणले जाते. वाढत्या नागरीकरणामुळे ठाणे शहरामधील विविध विकास कामांना या जलवाहिन्यांचा अडथळा होत आहे. यामुळे उपरोक्त दोन जलवाहिन्यांची पातळी खाली सरकविण्याबाबत ठाणे महानगरपालिकेद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास विनंती करण्यात आली आहे. मुंबई महानगराची पिण्याच्या पाण्याची सतत वाढणारी मागणी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कशेळी ते मुलुंड जकात नाक्यापर्यंत जलबोगदा बांधण्याचे निश्चित केले आहे. हे काम सप्टेंबर २०२४ पासून प्रगतिपथावर आहे. तसेच, ऑक्टोबर २०३० पर्यंत ते पूर्णत्वास येणे अपेक्षित आहे.

श्री. गगराणी पुढे म्हणाले की, कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान ७.१ किलोमीटर अंतरादरम्यान पाणी वहन करण्यासाठी जलबोगदा बांधकाम करण्यात येत आहे. या अंतर्गत मुलुंड जकात नाका येथे १३४ मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात येत आहे. पैकी शाफ्टचे उत्खनन कार्य १३० मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे. तर, बोगदा खनन कार्य पूर्ण झाल्यानंतर बोगदा खनन यंत्र बाहेर काढण्यासाठी कशेळी (भिवंडी) येथे १२८ मीटर खोलीचा पुनर्प्राप्ती शाफ्ट उभारण्यात येत आहे. पैकी शाफ्टचे उत्खनन कार्य १५ मीटर खोलीपर्यंत पूर्ण झाले आहे.

प्रकल्प अंतर्गत बोगदा खनन संयंत्राच्या सहाय्याने बोगदा खोदकामास जुलै २०२६ पासून सुरुवात करण्यात येणार आहे, असेदेखील श्री. गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *