वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात बहरणार ‘मुंबई पुष्पोत्सव’

 वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात बहरणार ‘मुंबई पुष्पोत्सव’

मुंबई प्रतिनिधी, दि. 31 : बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मुंबई पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील. उर्वरित दोन दिवस म्हणजेच दिनांक ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ‘मुंबई पुष्पोत्सव’ नागरिकांसाठी खुला असेल. यंदाचा हा २९ वा पुष्पोत्सव आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (उद्याने) श्री. अजितकुमार आंबी आणि उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली ‘मुंबई पुष्पोत्सव’ भरविण्यात येत आहे.

शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या मुंबईकरांसाठी ‘मुंबई पुष्पोत्सव’ म्हणजे एक सुगंधी पर्वणी असते. विविध प्रजातींची रंगीबेरंगी फुलझाडे, फळझाडांची रोपे, औषधी वनस्पती तसेच विविध ऋतूंमध्ये आढळणारी फुले आदी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा ‘मुंबई पुष्पोत्सवात’ समावेश असतो. पर्यावरणाची आवड आणि फुलझाडांवर प्रेम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींसाठी पुष्पोत्सवात उद्यानविषयक साहित्याची विक्री, झाडांसाठी लागणारी खते आदींची दालनेही येथे खुली करण्यात येणार आहेत. या तीन दिवसांच्या ‘मुंबई पुष्पोत्सवात’ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

पर्यावरणप्रेमींसाठी उद्यान विषयक कार्यशाळा
मुंबई पुष्पोत्सवासोबतच दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उद्यान विषयक कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळेमध्ये बागकाम कसे करावे, झाडांची निगा कशी राखावी, रोपांना, झाडांना, वेलींना कोणते खत कधी व किती प्रमाणात द्यावे, याविषयी अभ्यासपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मुंबई पुष्पोत्सवाला असणार आकर्षक संकल्पनेचे कोंदण
मुंबई पुष्पोत्सवात फुलझाडांची सुरेख मांडणी आणि आकर्षक सजावट केली जाते. यासोबतच दरवर्षी एक खास संकल्पना घेवून पुष्पोत्सव साजरा केला जातो. गतवर्षी भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले होते. विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून राष्ट्रध्वज, भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती तसेच राष्ट्रीय फळ आंब्याची रचनाही झेंडूच्या फुलांनी साकारली होती. या सजावटीने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवातही आगळीवेगळी आणि आकर्षक संकल्पना राबविण्यात येणार आहे. सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *