राज्याला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार उद्या घेणार शपथ
मुंबई, दि. ३० : महाराष्ट्राचे उमदे आणि कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाला वेदना झाल्या असतानाच काल सायंकाळपासून घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडीनंतर उद्या सायंकाळी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून वेगळे होत अजित पवार यांनी प्रसंगी अन्य पक्षांशी हातमिळवणी करावी लागूनही आपली विचारधारा आणि कार्यशैली जपत उपमुख्यमंत्री पदी उत्तम कामगिरी केली. त्याच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी आता त्यांच्या सुविद्य पत्नी खासदार सुनेत्रा पवार भरुन काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. अजित पवारांना संसारीक आयुष्यात ३७ वर्षे साथ देत आणि राजकीय,सामाजिक कामातही योगदान देणाऱ्या सुनेत्रा पवार आभाळाएवढं दु:ख झेलावं लागत असतानाही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उद्या उपमुख्यमंत्रीदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभणार आहेत.
उद्या सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय उपमुख्यमंत्री पद तसेच विधिमंडळ पक्षनेत्याबद्दल घेईल तो आपल्याला मान्य असेल असे मत देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले . याआधी काल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी बारामती इथे चर्चा केली, त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यावर पुढील राजकीय घडामोडींना वेग आला. अखेर कार्यकर्ते आणि पक्षाच्या आग्रहानुसार सुनेत्रा पवार यांनी हे पद स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता एका सध्या समारंभात त्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील.
अजित पवार यांच्याकडे अर्थखातं, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खातं होतं. ही महत्त्वाची खाती कुणाला द्यायची यावरही खलबतं केली जात आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचं असलेलं अर्थखातं हे आपल्याकडेच राहावं असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये बंद दाराआड तब्बल 45 मिनिटांहून अधिक चर्चा झाल्याची माहिती आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला एकसंध बांधण्यासाठी पवार कुटुंबीयांमधील कुणाकडे तरी पक्षाची धुरा असावी असं मत भाजपच्या नेतृत्वाचं असल्याची माहिती आहे. त्यामुळेच पक्षप्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची देखील माहिती मिळत आहे.
सुनेत्रा पवार यांची पार्श्वभूमी
सुनेत्रा अजित पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी मंत्री आणि लोकसभा खासदार राहिले आहेत.
राजकारणात प्रत्यक्ष पद स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्यांनी ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना करून सेंद्रिय शेती आणि ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी योगदान दिले आहे. यासोबतच त्या बारामतीमधील महत्त्वाच्या संस्थांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या देखील सांभाळत आहेत.
2024 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना अपयश आले. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड केली.
प्रफुल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्या खासदार म्हणून निवडून आल्या.
SL/ML/SL