अजित पवार विमान दुर्घटनेच्या CID चौकशीचे आदेश
मुंबई, दि. 30 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. राज्य सरकारने या दुर्घटनेची CID चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तपास प्रक्रियेत कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या अपघाताच्या शेवटच्या काही मिनिटांत नेमके काय घडले, याचा उलगडा CID चौकशीतून होण्याची शक्यता आहे. वैमानिकांची भूमिका, तांत्रिक बिघाड, हवामान स्थिती आणि एटीसीशी झालेला संवाद या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी असणार आहेत.
दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने याआधीच अपघातस्थळी भेट देऊन आवश्यक नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. विमानाचे अवशेष, जळालेल्या भागांचे नमुने आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे. हा संपूर्ण तपास बारामती पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या ‘एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट’च्या अनुषंगाने केला जाणार आहे. CID तपासात फॉरेन्सिक अहवाल, एटीसी लॉग्स आणि प्राथमिक माहिती यांचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, हे विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात आले होते. त्या वेळी वैमानिकांना सांगण्यात आले की हवामान सामान्य आहे, वाऱ्याचा वेग कमी आहे आणि दृश्यमानता सुमारे 3000 मीटर इतकी आहे. यानंतर वैमानिकांनी रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत असल्याची माहिती दिली. मात्र, त्यांना रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचे त्यांनी एटीसीला कळवले होते.
थोड्या वेळाने पायलटने पुन्हा एटीसीला कळवले की रनवे दिसू लागल्यावर ते माहिती देतील. त्यानंतर सकाळी 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे एटीसीकडून कळवण्यात आले. मात्र, यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, अशी माहिती एटीसीवर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या दृश्याने नियंत्रण कक्षातही एकच खळबळ उडाली होती.
SL/ML/SL