दादा तुम्ही वेळ चुकवली… मुख्यमंत्री फडणवीसांचा भावुक लेख

 दादा तुम्ही वेळ चुकवली… मुख्यमंत्री फडणवीसांचा भावुक लेख

‘दादा, आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती… यावेळी मात्र चुकवलीत.’ …राजकारणापलीकडेही मैत्री जपणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना वाहिलेली हृद्य श्रद्धांजली…

मंगळवारी (दि. २७ जानेवारी) अजितदादा आणि मी असे आम्ही दोघे मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली; तेथेही दादा माझ्यासोबत होते. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च होतो, यावर दादांनी प्रश्न उपस्थित केला. प्रकल्प लांबू नयेत, यासाठी आम्ही दोघांनीही आसूड उठविले. सार्वजनिक बांधकाम खात्याने सरकारचे ७६४ कोटी कसे वाचविले, याची माहितीही देण्यात आली. दादांना आनंद झाला. सदोदित तिजोरीची काळजी करणारा अर्थमंत्री म्हणून मी निश्चिंत असायचो, ‘अशाच गोड बातम्या प्रत्येक बैठकीत देत जा,’ अशी कोपरखळीही त्यांनी मारली. पण, अशा बातम्या ऐकण्यासाठी पुढच्याच दिवसापासून आपण नसू, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. ही बैठक झाल्यानंतर पुन्हा पाऊण तास आम्ही माझ्या दालनात गप्पा मारत बसलो होतो. नियती निष्ठुर असते, आपले काही चालत नाही. दादा, तुम्ही आजवर कधीही वेळ चुकवली नव्हती, या वेळी मात्र चुकवलीत. दादा, ही खंत कायम राहील, तुम्ही अकाली ‘एक्झिट’ घेतली.
बुधवारी सकाळी बारामतीजवळ विमान अपघात झाल्याची बातमी कानावर आली, तेव्हाही इतके काही विपरीत घडेल, असे वाटले नव्हते. डॉक्टर जोवर काही सांगत नाहीत, तोवर कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवायला मन धजावत नव्हते. सुप्रियाताईंशी बोलणे होत होते. पण अखेर ती वाईट बातमी आलीच. माझा जवळचा, दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. कधीच विस्मरणात जाणार नाही, असा धक्का देणारा हा प्रसंग आहे.
दादा हे कायम माझे मित्र होते. खूप जवळून असे काम आम्ही २०१९पासून केले असले तरी त्याही पूर्वी विकासाच्या किंवा राज्यहिताच्या विषयांवर आम्ही एकमेकांसोबत होतो. दूरगामी व्हिजन असलेले नेते फार कमी असतात. दादा हे त्यापैकी एक. शब्दाला जागणारा नेता, मित्र कसा असतो, हे मी अत्यंत जवळून दादांबाबत अनुभवले. कितीही संकट आले तरी शब्दाला किंमत असते आणि प्रसंगी ती मोजायचीही असते, हे दादांकडून शिकण्यासारखे आहे. काही इनिंग्ज आम्ही नव्याने सुरू केल्या होत्या. ही इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली. २०१४ नंतर त्यांच्या तोंडी कायम माझे नाव ‘सीएम साहेब’ असे असायचे. २०१९मध्ये ते उपमुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता. पण, सभागृहात बोलताना ते हमखास मला ‘सीएम साहेब’ म्हणायचे. मग हळूच जीभ चावून ‘देवेंद्रजी’ म्हणायचे.
आमची मैत्री राजकारणापलीकडची होती. अवांतर विषयांवर बोलण्याची मैफल दादा सोबत असले की घडायची. आम्ही कितीदा रात्री उशिरापर्यंत गप्पा करीत बसायचो. पण, त्यातही कामाच्या विषयांची त्यांची यादी तयार असायची. कोणत्या विषयांवर बोलायचे आहे, याचा कागद हाती असायचा. धीरगंभीर विषयांवर बोलून झाले की दादांचे व्यक्तिमत्त्व खुलायचे. मग त्यांच्यातील कुणाची आणि कशाचीच पर्वा न करणारे असे उत्तुंग आणि दिलखुलास दादा व्यक्त व्हायचे. त्यांच्यातील भावनाप्रधान दादा फार कमी लोकांनी पाहिले. पण, मला तेही दादा अनुभवता आले. कारण, आम्ही फार छोट्या कालखंडात पराक्रमच तेवढे केले.
राजकारणात अनेकदा माणसे वरकरणी पाहिली जातात; त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहिले जात नाही. पण, कामाचा प्रचंड आवाका आणि ठायी असलेला अनुभव या

अर्थाने दादा एक अतिशय मोठे नेतृत्व. सकाळी सात वाजता दिवस सुरू करणारे दादा थांबत नसत. सरकारमध्ये असताना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. ते क्षणिक अप्रिय वाटत असले तरी दीर्घकालीन जनहिताचे असतात. अशा वेळी राजकीय कौशल्य पणाला लागत असते. व्यवस्थापन कौशल्यात जोखीम आणि हिंमत दोन्ही ठेवावी लागते. असे निर्णय घेण्यातही दादा अग्रेसर असत. त्यामुळे त्यांच्यापुढे एखादी फाईल गेली किंवा विषय गेला तर दोनच उत्तरे ऐकू यायची. एकतर होकार किंवा नकार. ‘पाहतो… करतो’ ही शैली दादांना मान्यच नव्हती. या शैलीने लोक त्या क्षणी दुखावतातही. पण, ती दीर्घकाळासाठी जोडलीही जातात. सभागृहात उत्तरे देतानासुद्धा गुळगुळीत नाहीत, तर ठामपणे उत्तरे देताना ते दिसायचे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सभागृह सुरू होण्यापूर्वी दादा सभागृहात यायचे; मग ते मुंबई असो की नागपूर, सभागृहातील नवीन सदस्यांना शिस्त आणि नियम शिकवण्यातही त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. मंत्रिमंडळ बैठकीत येण्यापूर्वी प्रत्येक प्रस्तावाचा अभ्यास करून ते आलेले असत. १८-२० विषय असले तरी नेमक्या कोणत्या विषयात कोणता मुद्दा उपस्थित करायचा, हे त्यांना ठावूक असे.
आमच्यात काही समान गोष्टी होत्या. काम घेऊन येणारा आपल्या पक्षाचा, की दुसऱ्या, याचा विचार दादांनी कधीच केला नाही. नेत्याने सतत जनतेत राहायचे असते, हेही पथ्य दादांनी आयुष्यभर पाळले. २४*७ कामांत व्यग्रता हेच सूत्र दादांनी कायम पाळले. आजही (२८ जानेवारी) ते आपल्या सभांसाठी भल्या पहाटे निघाले होते. दादा आणि मला दोघांनाही क्रिकेट सामना बघण्याची आवड, कोणताही सामना असला की मधूनच आम्ही दोघेही ‘स्कोअर’ काय झाला, याची माहिती घेत असायचो. गाणी हादेखील आमचा समान आवडता छंद. त्यातच दादांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ अफलातून. कितीही गंभीर विषय असू द्या, ते थेट गमतीत बोलून समोरच्याची विकेट बेमालूमपणे घ्यायचे.
बांधकामाची गुणवत्ता या विषयात दादांना फार रस. प्रत्येक सरकारी बांधकामावर त्यांची कडक नजर असायची. अनेकदा सकाळी सहा वाजता त्यांनी बांधकामाची पाहणी केली आहे. जराही चूक सापडली, तर समोरच्याची ऐशीतैशी करण्यास ते मागेपुढे पाहत नसत. त्यामुळेच त्यांच्या देखरेखीत झालेल्या सरकारी इमारती खासगीलाही लाजवतील, अशा झालेल्या आहेत. बारामती मेडिकल कॉलेजची वीट न् वीट त्यांनी स्वतःच्या देखरेखीत ठेवली. नियतीने त्याच मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे पार्थिव आणले, ही पण एक विटंबनाच. मनात आज अनेक वेदना आहेत.
दादांना दूध प्यायला खूप आवडायचे. आमच्या हेलिकॉप्टरमध्ये सुगंधी दूध, ताक, कोल्ड्रिंक असायचे. पण, दादा नेहमीच दुधाला पसंती देत. ‘मी रोज हळद टाकून दूध घेतो,’ असे ते आवर्जून सांगायचे सुद्धा. एकदा आम्ही विमानप्रवासात होतो. विषय रंगत गेले. मग विषय माझ्या आजवर झालेल्या विमान, हेलिकॉप्टर अपघातांपर्यंत येऊन पोहोचला. मी एकेक प्रसंग रंगवून सांगू लागलो. दादा गमतीने पायलटला म्हणाले, ‘अरे बाबा, जवळ कुठली धावपट्टी दिसते का पाहा, मला खाली उतरव आणि मग पुन्हा तू जा.’ मी दादांना सांगितले की, ‘माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे, माझे अपघात खूप झाले. पण, काळजी करू नका, मी विमानात असलो, की काही इजा होत नाही. त्याच दादांना विमान अपघाताने आपल्यातून हिरावून न्यावे, ही शोकांतिकाच. जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला माझा अत्यंत जवळचा सहकारी मी गमावला. हे माझे वैयक्तिक नुकसान तर आहेच; पण महाराष्ट्राचेही मोठे नुकसान आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे.

  • देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *