घरगुती गॅस सिलिंडर होणार 50% हलका आणि पारदर्शक
मुंबई, दि. २९ : वाहतूकीसाठी आणि वापरासाठी अवजड असलेला लोखंडी टाकीच्या घरगुती गॅस सिलेंडरचे वजन आता अर्धे होणार आहे. तसेच तो पारदर्शक असल्यामुळे किती गॅस शिल्लक आहे हे देखील स्पष्टपणे दिसणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या मोठ्या कंपनीने घरगुती वापरासाठी एक नवीन प्रकारचे एलपीजी सिलिंडर सुरू केले आहे. या सिलिंडरला ‘भारतगॅस लाइट – नव्या भारताचा नवा सिलिंडर’ असे नाव देण्यात आले आहे. हे सिलिंडर विशेष प्रकारच्या संमिश्र सामग्रीपासून तयार करण्यात आले असून, ते पारंपरिक लोखंडी सिलिंडरपेक्षा खूप वेगळे आणि सुधारित आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे सिलिंडर किचनमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी विशेषतः डिझाइन करण्यात आलंय. ज्यामुळे दैनंदिन कामे सोपी होऊन गॅस वापरात सुरक्षितता वाढणार आहे. ग्राहकांच्या सोयी आणि नवकल्पनेवर आधारित हा सिलेंडर बनवण्यात आलाय. हे सिलिंडर गोवा राज्यात सुरुवातीला उपलब्ध करण्यात येतय. यामुळे घरगुती गॅस वापरात एक मोठा बदल येणार असून शहर आणि ग्रामीण भागातील लोकांना फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. हे सिलिंडर आधुनिक भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले असून, ते हलके आणि वापरण्यास सोपे असल्याची माहिती कंपनीने दिली.
याशिवाय हे सिलिंडर विस्फोटरोधक आहे. म्हणजे कठीण परिस्थितीतही धोका कमी होतो आणि अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. ग्राहकांच्या सुरक्षितता आणि सोयीला प्राधान्य देण्याच्यादृष्टीने हे सिलिंडर बनवण्यात आलं आहे.
गॅसची पातळी दिसल्यामुळे अचानक गॅस संपण्याची भीती नसते. ज्यामुळे दैनंदिन जीवन सुसह्य होते. गंज न येण्यामुळे किचन स्वच्छ राहते आणि सिलिंडरचे आयुष्य वाढणार आहे.
SL/ML/SL