‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने १७७१ दिव्यांगांना कृत्रिम अवयव

 ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने १७७१ दिव्यांगांना कृत्रिम अवयव

पुणे दि २९ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पुढाकाराने जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत महाराष्ट्रातील १७७१ दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात येत आहेत. थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील ट्रस्टच्या आरोग्य सेवा केंद्र, हिराबाग कोठी येथे हे शिबीर आठवडाभर चालणार आहे.

टाटा ऑटोकॉम सिस्टिम्स, पिनॅकल इंडस्ट्रीज आणि श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपूर फूट इंदौर यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी टाटा ऑटोकॉम सिस्टिम्स लि. चे व्हाईस चेअरमन डॉ.अरविंद गोयल, सुमती गोयल, पिनॅकल इंडस्ट्रीज लि.चे चेअरमन डॉ.सुधीर मेहता, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह सुवर्णयुग तरुण मंडळ सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते. उपक्रमाचे हे ४ थे वर्ष आहे.

डॉ.सुधीर मेहता म्हणाले, आपण एकत्रितपणे जे कार्य करू शकतो, ते एकटे राहून करता येत नाही. त्यामुळे सगळ्या संस्था मिळून एकत्रितपणे रुग्णसेवेचे कार्य करीत आहेत. गरजू रुग्णांपर्यंत पोहोचणे हा आमचा उद्देश आहे. आपल्याला अवयव नाहीत, तर काम बंद ही अनेकांची मानसिकता असते. पण कृत्रिम अवयव लावल्यानंतर आपण काम करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. पुण्याप्रमाणेच नागपूर, विदर्भ या भागात देखील भविष्यात शिबीर आयोजित केले जाईल. तसेच दिव्यांगांना रोजगार निर्मिती होईल, या दृष्टीने देखील प्रयत्न होतील, असे डॉ. अरविंद गोयल यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, पुण्यासह लातूर, पराभणी, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, धाराशिव येथून अनेक दिव्यांग शिबीरासाठी आले असून गोवा राज्यातून देखील रुग्ण आले आहेत. आजपर्यंत ट्रस्टच्या पुढाकाराने ७ हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले आहेत. शिबीरामध्ये व्हीलचेअर, कुबड्या, काठ्या, कॅलिपर, जयपूर फूट देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे पोलिओग्रस्त लहान बालकांसाठी विशेष व्हीलचेअर देखील देण्यात आली आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *