महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती
मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा (MCA ) कारभार आता प्रशासक सांभाळणार आहेत.या संघटनेच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) स्थगिती दिल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी आता मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी.ए.सानप यांची ‘एमसीए’च्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
एमसीएचा प्रशासकीय कारभार सुरळीत पार पडावा यासाठी आणि सर्व निर्णय घेण्यासाठी योग्य व्यक्तीला अधिकार हवेत यासाठी ही नियुक्ती करण्यात येत असल्याचे धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.एमसीएची निवडणूक ६ जानेवारीला होणार होती.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमसीएने तत्कालीन अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वात संघटनेची सदस्यसंख्या १५४ वरून थेट ५७१ वर नेली होती.एमसीएने मनमानी करताना या यादीत राजकीय लोकांचीच अधिक नावे घुसवली होती.यावरून क्रिकेट वर्तुळात बरेच वादंग उठले होते.या घुसखोरीविरोधात माजी क्रिकेटपटू केदार जाधव याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ‘एमसीए’वर कठोर शब्दांत ताशेरे ओढताना निवडणुकीला स्थगिती दिली होती. तसेच, ‘एमसीए’ला ३ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते. उच्च न्यायालयात पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला होणार आहे.या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणातील कागदपत्रांची आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाची दखल घेऊन हा प्रशासक नेमणुकीचा निर्णय दिला आहे. एमसीएचे सीईओ अजिंक्य जोशी यांच्या नावे हा आदेश जारी करण्यात आला आहे.