वांद्रे (पूर्व) येथील नवीन आकाश मार्गिकेचे (Sky Walk) पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण

 वांद्रे (पूर्व) येथील नवीन आकाश मार्गिकेचे (Sky Walk) पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, 27
वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे न्यायालय, वांद्रे – कुर्ला संकुल (BKC), म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ये – जा करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी निर्मित नवीन आकाश मार्गिकेचे (Sky Walk) लोकार्पण माननीय माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते काल (दिनांक २६ जानेवारी २०२६) करण्यात आले आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ही उच्च प्रतीची, दीर्घकाळ टिकणारी व आधुनिक सुविधांनी युक्त आकाश मार्गिका उभारण्यात आली आहे.

या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक आमदार श्री. वरुण सरदेसाई, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम तसेच एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती मृदुला अंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आकाश मार्गिकेचे कामकाज विक्रमी वेळेत पूर्ण करणारे कार्यकारी अभियंता श्री. नामदेव रावकाळे, सहायक अभियंता श्री. प्रशांत जावळे, दुय्यम अभियंता श्री. अमित दसूरकर यांचा पालकमंत्री श्री. शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानिमित्ताने संबोधित करताना पालकमंत्री श्री. शेलार म्हणाले की, मुंबई उपनगरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम, सुरक्षित आणि नागरिक केंद्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कलानगर जंक्शन दरम्यान उभारण्यात आलेली नवीन आकाश मार्गिका (Sky Walk) नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाशी थेट जोडणी असल्यामुळे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आकाश मार्गिकेमुळे वांद्रे (पूर्व) परिसरातील पादचारी वाहतूक अधिक सुरक्षित होईल. प्रवासाचा वेळ वाचेल आणि अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व), वांद्रे न्यायालय, म्हाडा कार्यालय तसेच वांद्रे–कुर्ला संकुल (BKC) या अत्यंत वर्दळीच्या परिसरात दररोज मोठ्या संख्येने पादचाऱ्यांची ये-जा होत असते. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रचंड वाहतूक आणि अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचणी व अपघाताचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुलभ आणि वेळ बचत करणारी सुविधा म्हणून या आकाश मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे, असेदेखील श्री. शेलार यांनी नमूद केले.

वांद्रे रेल्वे स्‍थानक (पूर्व) पासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कलानगर जंक्शन पर्यंतची नवीन आकाश मार्गिका एकूण ६८० मीटर लांबीची व सरासरी ५.४० मीटर रूंदीची आहे. पादचाऱ्यांच्या विविध ठिकाणांहून सहज प्रवेशासाठी ४ जिने आहेत. सुलभ मार्गक्रमण करण्यासाठी २ स्वयंचलित सरकत्‍या जिन्‍यांची (Escalator) जोड आहे. सुरक्षितता आणि निगराणीसाठी १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्‍यात आले आहेत.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रचंड वाहतुकीमुळे बांधणी करण्याचा मध्यरात्रीचा मर्यादित कालावधी, आकाश मार्गिकेच्या खालील अनंत काणेकर रस्त्यावरील पादचा-यांची वर्दळ यामुळे आकाश मार्गिका उभारताना विशेष काळजी घ्यावी लागली. तसेच, उपयोगिता वाहिन्यांचे स्थलांतर अशी विविध आव्‍हाने असतानाही आकाश मार्गिकेचे काम निर्धारित कालावधीमध्‍ये पूर्ण करण्यात आले. हे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करणे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक, कौशल्याचे होते. हे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले, असे श्री. शेलार यांनी शेवटी नमूद केले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर म्‍हणाले की, वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) ते म्हाडा कार्यालय, पश्चिम पूर्व महामार्ग, वांद्रे न्यायालय, वांद्रे – कुर्ला संकुलच्या वाणिज्यिक परिसरातील कार्यालयांमधून मार्गक्रमण करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी ही आकाश मार्गिका उपयुक्त ठरणार आहे. थेट रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला जोडणी असल्यामुळे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे रस्ता ओलांडण्यासाठी उपलब्ध सुविधेमुळे पादचारी या आकाश मार्गिकेचा वापर करतील. त्यामुळे अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल. आकाश मार्गिकेचे बांधकाम पूर्ण झाले असून संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, सुरक्षा प्रमाणपत्र तसेच आकाश मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचे ना – हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. पुनर्बांधणी करण्यात आलेली आकाश मार्गिका प्रजासत्ताक दिनापासून खुली करण्यात आली आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *