९२ वी राष्ट्रीय बिलीयर्डस् आणि स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६
पुण्याच्या आरव संचेती याने पटकावला तिहेरी मुकूट !!
पंधराव्या वर्षी अशी कामगिरी करणारा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू !!
पुणे, 27
९२ व्या राष्ट्रीय बिलीयर्डस् आणि स्नुकर अजिंक्यपद २०२५-२६ स्पर्धेत पुण्याच्या १५ वर्षीय आरव सचिन संचेती याने ऐतिहासिक कामगिरी करत ज्युनिअर (२१ वर्षाखालील) स्नुकर, सब-ज्युनिअर (१७ वर्षाखालील) बिलीयर्डस् आणि स्नुकर या तिनही गटामध्ये विजेतेपद संपादन करून तिहेरी मुकूट पटकावला. महाराष्ट्रा राज्यासह पुण्यामध्ये केवळ १५ वर्ष वय असताना २१ वर्षाखालील गटाचे आणि १७ वर्षाखालील गटाचे विजेतेपद संपादन करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच केवळ १५ वर्ष असताना या ज्युनिअर स्नुकर गटाचे विजेतेपद मिळणारा आरव देशातील पहिला खेळाडू ठरला आहे.
हरयाणा येथील बहादूरगढ एचएल शहरामध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेच्या ज्युनिअर (२१ वर्षाखालील) स्नुकर स्पर्धेत आरव याने तामिळनाडूच्या राहूल विल्यम्स् याचा ४-३ (६९-७५, ९०-२८, ५६-५९, ११-६६, ८२-२५, ६१-१०, ५९-२८) असा संघर्षपूर्ण पराभव केला आणि ऐतिहासिक कामगिरीसह विजेतेपद मिळवले. या गटामध्ये उपांत्य फेरीत आरव याने तामिळनाडूच्या ए. अब्दुल सैफ याचा ४-२ असा पराभव केला होता.
सब-ज्युनिअर (१७ वर्षाखालील) बिलीयर्डस् स्पर्धेत आरव याने तामिळनाडूच्या राहूल विल्यम्स्चा ३२०-३१६ असा चार गुणांचा फरकाने पराभव करून विजेतेपद मिळवले. या गटाच्या उपांत्य फेरीत आरवने कर्नाटकच्या मोहम्मद मुस्ताफा याचा २४२-१६८ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सब-ज्युनिअर (१७ वर्षाखालील) स्नुकर स्पर्धेत आरव याने मध्यप्रदेशच्या ओवेस खानचा ३-० (८०-२७, ८८(८८)-००, ७४-२६) असा पराभव करून या गटामध्ये निविर्वाद वर्चस्व गाजवले.
आरव हा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्नुकर आणि बिलीयर्डस् खेळाडू सचिन संचेती यांचा मुलगा असून आपल्या वडीलांप्रमाणेच त्याने या क्यु स्पोर्ट्स प्रकारात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आरव सध्या प्रशिक्षक विग्नेश संघवी याच्या मार्गदर्शनाखाली अमानोरा फर्न क्लब येथे सराव करतो. भारतीय (राष्ट्रीय) सब-ज्युनिअर २०२४ स्नुकर आणि बिलीयर्डस् गटात क्रमांक १ तसेच महाराष्ट्र (राज्यस्तरीय) सब-ज्युनिअर गटात क्रमांक १ असे आरवचे मानांकन होते.
ऑगस्ट २०२५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या पहिल्या हे-बॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आरव याने ज्युनिअर (१९ वर्षाखालील) गटाचे विजेतेपदही मिळवले होते. जुलै २०२५ मध्ये बाहरीन येथील मनामा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बिलीयर्डस् आणि स्नुकर फेडरेशन (आरबीएसएफ) जागतिक १७ आणि २१ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आरव याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. आरव हा एनआयओएस या खुल्या शालेय अभ्यासक्रमांतर्गत सध्या दहावी परीक्षेची तयारी करत आहे. २०२३ मध्ये झालेल्या आयबीएसएफ जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेतसुद्धा आरव सहभागी झाला होता. ही स्पर्धा रियाध, सौदी अरेबिया येथे झाली होती.
आरव याचा स्पर्धेतील सविस्तर निकालः
ज्युनिअर (२१ वर्षाखालील) स्नुकर स्पर्धाः अंतिम सामनाः आरव संचेती (महा) वि.वि. राहूल विल्यम्स् (तामिळनाडू) ४-३ (६९-७५, ९०-२८, ५६-५९, ११-६६, ८२-२५, ६१-१०, ५९-२८);
उपांत्य फेरीः राहूल विल्यम्स् (तामिळनाडू) वि.वि. जाबेझ नवीन कुमार (तामिळनाडू) ४-० (५१-०६, ६८-३८, ९२-४१, ४९-४७);
आरव संचेती (महा) वि.वि. ए. अब्दुल सैफ (तामिळनाडू) ४-२ (५२-५३, ६३-२८, ४५-७७, ७४-०९, ५६-३६, ४९-१९);
सब-ज्युनिअर (१७ वर्षाखालील) बिलीयर्डस् स्पर्धाः
अंतिम सामनाः आरव संचेती (महा) वि.वि. राहूल विल्यम्स् (तामिळनाडू) ३२०-३१६;
उपांत्य फेरीः आरव संचेती वि.वि. मोहम्मद मुस्ताफा (कर्नाटक) २४२-१६८;
सब-ज्युनिअर (१७ वर्षाखालील) स्नुकर स्पर्धाः
अंतिम सामनाः आरव संचेती (महा) वि.वि. ओवेस खान (मध्यप्रदेश) ३-० (८०-२७, ८८(८८)-००, ७४-२६);
उपांत्य फेरीः आरव संचेती वि.वि. राहूल विल्यम्स् (तामिळनाडू) ३-१ (६१(५०)-७०, ६३-३१, ५९-३४, ६४-१४); ओवेस खान वि.वि. नेवाँग खाम्पा (हिमाचलप्रदेश) ३-२ (२४-६९, ४८-२७, ४५-४६, ७८-४९, ६२-३९);KK/ML/MS