देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत उपक्रमाची विश्वविक्रमी नोंद
मुंबई, दि. २६ – ‘राष्ट्र प्रथम’ या उपक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभरात शासकीय ध्वजावंदनानंतर शालेय विद्यार्थ्यांचे एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन झाले. या उपक्रमात राज्यातील सर्व विभागातील एक लाख शाळांमधील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतावर शिस्तबद्ध व समन्वयपूर्ण कवायत सादर केली. सात लाख शिक्षकांनीही यात सहभाग नोंदवला. या उपक्रमाची अधिकृत नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डस्, लंडन (World Book of Records, London) या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली असून या माध्यमातून एक विश्वविक्रम प्रस्थापित झाला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा कवायत संचलनाचा सराव सुरू होता. यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत १४ मिनिटांचा मार्गदर्शक व्हिडीओ राज्यातील सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुंदर व शिस्तबद्ध कवायत सादर केली. यासोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हास्तरावर राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या अनुषंगाने एशिया बूक ऑफ रेकॉर्डस् (Asia Book of Records) आणि इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस् (India Book of Records) या दोन मान्यवर संस्थांकडूनही स्वतंत्र विश्वविक्रमांची नोंद करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेबद्दल समाधान व्यक्त करुन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, ‘राष्ट्र प्रथम’ हा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा, त्यांच्यामध्ये प्रखर देशप्रेम, शिस्त आणि एकात्मतेची भावना बळकट व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राज्यभर एकाच वेळी, सुनियोजित आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आला. सर्व जिल्हे, तालुका व शाळा स्तरांवर या कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील विविध सेवाभावी संस्था, जिल्हा प्रशासन, आरोग्य, पोलीस, अग्निशमन विभागांसह शिक्षणप्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडला. ‘राष्ट्र प्रथम’ या उपक्रमाने केवळ विश्वविक्रम प्रस्थापित केला नाही, तर भावी पिढीच्या मनात प्रखर राष्ट्रभक्तीचे बीज रोवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत हा उपक्रम सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व भाषिक शाळांमध्ये होईल, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या राज्यव्यापी उपक्रमासाठी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त, संचालक यांच्यासह शालेय शिक्षण, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागातील सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक यांनी परिश्रम घेतले.ML/ML/MS