जोरदार हिमवृष्टीमुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित
नवी दिल्ली, दि. २३ : जोरदार हिमवृष्टीमुळे माता वैष्णोदेवीची यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. खराब हवामान, घसरते मार्ग आणि यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विचार करता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. काल रात्रीपासून वैष्णोदेवी मंदिर परिसरात पावसासह हिमवृष्टी सुरू असून शुक्रवारी सकाळपासून बर्फवृष्टीची तीव्रता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वैष्णोदेवी यात्रेसाठी नवीन यात्रेकरूंची नोंदणी तात्काळ थांबवण्यात आली आहे. त्रिकुटा टेकड्यांवर मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे मार्ग अत्यंत निसरडे बनले असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
हिमवृष्टीमुळे बाणगंगा ते भवन या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला असून यात्रेकरूंना चालणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे नवीन भाविकांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आधीच मार्गावर असलेल्या यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले असून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
श्राइन बोर्ड आणि प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. हवामानात सुधारणा झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊनच यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. भाविकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
SL/ML/SL