अदानी समूह महाराष्ट्रात गुंतवणार 66 अब्ज डॉलर
मुंबई, दि. 23 : दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी केल्यामुळे चर्चेत आलेला अदानी समूह आता महाराष्ट्रासाठी 66 अब्ज अमेरिकन डॉलरचा (अंदाजे सहा लाख कोटी रुपये) दीर्घकालीन गुंतवणूक आराखडा सादर केला. या आराखड्यात विमान वाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांचा समावेश आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांवर आधारित विकास अजेंड्यामध्ये दीर्घकालीक भागीदार म्हणून अदानी समूह काम करणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौर्यावर आहेत. त्यांनी 30 लाख कोटींची गुंतवणूक आणल्याचा दावा केला आहे. त्यात आज अदानी समूहाने (Adani Group) महाराष्ट्रासाठी महत्त्वाची घोषणा केली.
अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांनी गुंतवणुकीची माहिती देताना सांगितले की, ही गुंतवणूक पुढील सात ते दहा वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. यात 3,000 मेगावॅट एकत्रित क्षमतेचे हरित, एकात्मिक डेटा सेंटर पार्क, विमानतळाजवळील एकात्मिक अरेना, कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प, 8,700 मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प तसेच सरकारच्या खासगी सहभागासाठी विकसित होत असलेल्या धोरणाशी सुसंगत असे सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन युनिट प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीमधून मालमत्ता निर्मिती ते परिसंस्था उभारणी असा आमचा प्रवास होणार आहे.
अदानी समूहाने दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाची महाराष्ट्रातील ही प्रस्तावित गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर शहरी परिवर्तन आणि पुढील पिढीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर होणार आहे. यामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचाही समावेश आहे.
SL/ML/SL