वाहतुकीचे नियम मोडल्यास जप्त होणार ड्रायव्हिंग लायसन्स
मुंबई, दि. २३ : भरधाव वाहने चालवून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या महाभागांना आता चांगलीच अद्दल घडणार आहे. एखाद्या वाहनचालकाने जर वर्षभरात पाच किंवा त्याहून अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याच ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. ही कारवाई नियम तोडणाऱ्यांवर अधिक प्रभावी आणि कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आली आहे.
यापूर्वी वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सहसा दंड आकारला जात होता, परंतु अनेक वेळा नियम मोडल्यासही कारवाई कमी प्रमाणात किंवा प्रतीकात्मक स्वरूपात होत असल्याची तक्रार होती. या नव्या निर्णयानुसार, नियम मोडणाऱ्यांवर ठोस परिणाम होईल आणि वाहनचालक नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित होतील.
किरकोळ चुकांमुळे अनेकदा मोठे रस्ते अपघात होतात आणि सार्वजनिक धोका निर्माण होतो. त्यामुळेच छोट्याछोट्या नियमांकडेही परिवहन मंत्रालयाने लक्ष दिले आहे. वाहन चोरी, अपहरण, प्रवाशांवर हल्ला, ओव्हरलोडिंग आणि अतिवेग यांबरोबरच आता हेल्मेट न परिधान करणे तसेच सीटबेल्ट न लावणे असे नियम मोडणेही वाहनचालकांना भोवणार आहे.
नवीन नियमानुसार, वाहन चोरी, प्रवाशावर हल्ला, प्रवाशाचे अपहरण, वेगाची मर्यादा ओलांडणे, मर्यादेपेक्षा जास्त सामान गाडीत भरणे, सार्वजनिक ठिकाणी वाहन बेवारस स्थितीत सोडून जाणे अशा स्थितीत वाहन परवाना निलंबित होऊ शकतो. त्याचबरोबर हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे, सिग्नल मोडणे यांसारख्या तुलनेने कमी तीव्रतेच्या गुन्ह्यांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.
SL/ML/SL