डिजिटल युगात वळणदार अक्षर जपण्यासाठी अभिनव उपक्रम…
वाशीम दि २३: डिजिटल युगात मोबाईल, टॅब आणि संगणकाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर हळूहळू दुर्लक्षित होत चालले आहे. सुंदर आणि वळणदार अक्षर हे व्यक्तिमत्त्वाचा दागिना मानले जात असले, तरी आजच्या काळात असे हस्ताक्षर दुर्मिळ होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व पटवून देण्यासाठी वाशीम येथील हॅपी फेसेस द कॉन्सेप्ट स्कूलमध्ये जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात नामांकित कॅलिग्राफी तज्ज्ञ रामेश्वर पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी पेन कसा धरावा, अक्षरांमधील योग्य अंतर कसे ठेवावे, विविध रेषांचा वापर कसा करावा, अक्षरांचे वळण आणि मांडणी कशी असावी यावर त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रश्न विचारून शंका दूर केल्या.
कार्यशाळेनंतर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये हस्ताक्षर सुधारण्याची आवड निर्माण झाली. शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, सुंदर हस्ताक्षरामुळे केवळ लेखनच नव्हे तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्त आणि एकाग्रता देखील वाढते.
डिजिटल साधनांचा वापर अपरिहार्य असला तरी हस्ताक्षराचे महत्त्व अबाधित आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना लेखनकलेची गोडी लागेल आणि सुंदर हस्ताक्षर जपण्याची सवय निर्माण होईल, असा विश्वास शाळेचे प्राचार्य प्रवीण नसकरी यांनी व्यक्त केला.ML/ML/MS