रुग्णांच्या सोयी-सुविधांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा- श्री. मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि २२
सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात येणाऱया नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देतानाच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानस्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यासह केंद्र, राज्य सरकारच्या आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांनी दिले. सेठ गोर्धनदास सुंदरदास महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात आज (दिनांक २२ जानेवारी २०२६) श्री. लोढा उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी आमदार श्री. कालिदास कोळंबकर, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता (केईएम रुग्णालय) डॉ. (श्रीमती) संगीता रावत आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभावे, या अनुषंगाने संवाद केंद्र (कम्युनिकेशन सेंटर) उभारण्यात यावे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना देशभरातील तज्ज्ञ व्यक्तींशी जोडले जाणे शक्य होईल. वैद्यकीय क्षेत्रात मोठी स्वप्न पाहणाऱया विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरावे, असेही श्री. लोढा यावेळी म्हणाले.
नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना वैद्यकीय उपचाराची माहिती, आसन व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य क्षेत्रातील योजनांची माहिती रुग्णांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी महाविद्यालयाच्या एका चमूने ही प्रणाली विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास, मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचनाही श्री. लोढा यांनी याप्रसंगी केली.
आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षमपणे उपलब्ध करून देतानाच डिजिटल तंत्रज्ञाचाही वापर केईएम रुग्णालयात प्रभावीपणे करण्यात आला आहे. ‘रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली’ (हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम) (HMIS) या सुविधेचा अतिशय प्रभावीपणे वापर करण्यासाठी केईएम रुग्णालय सज्ज झाले आहे. लवकरच संपूर्ण क्षमतेने या प्रणालीचा वापर रुग्णालयात सुरु होईल, अशी माहिती उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.
रुग्णालयातील रुग्णशय्या क्षमता ही २ हजार असून येथे प्रतिदिन ६ हजार बाह्यरुग्ण हाताळण्याची क्षमता आहे. के. ई. एम. रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सगळ्यांचे योगदान यामध्ये आहे. रुग्णांच्या सुविधेसाठी येत्या काळात ‘सर्व्हीस टॉवर’ निर्माण करण्यात येत आहे. या टॉवरच्या माध्यमातून रुग्णांना विविध चाचण्यांची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा मानस असल्याची माहिती के. ई. एम. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांसाठी १२०० विद्यार्थी क्षमता असलेल्या वसतिगृहाची सुविधा लवकरच उपलब्ध होत आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. KK/ML/MS