महालक्ष्मी येथील केबल स्टेड उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण होणार

 महालक्ष्मी येथील केबल स्टेड उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण होणार

मुंबई, दि २२
महालक्ष्‍मी रेल्‍वे स्‍थानकाजवळ केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्‍यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. उड्डाणपुलाच्या विविध कामांचे उप अंग (Sub activity) निश्चित करून संपूर्ण प्रकल्पाची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. केबल – स्टेड पुलास आधार देण्यासाठी ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन (भव्य लोखंडी खांब) उभारण्यात येत आहे. त्‍याचे ५५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. पायलॉन, पोहोच रस्ते तसेच सर्व अनुषंगिक कामे वेळेत पूर्ण करून दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत उड्डाणपूल पूर्णतः तयार होईल, अशा पद्धतीने सविस्तर नियोजन करावे. पूल प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान सुरक्षा मानके, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि तांत्रिक तपासण्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

महालक्ष्‍मी येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍यावतीने नवीन पूल बांधण्यात येत आहे. विकास नियोजन आराखड्यानुसार सुरू असलेल्‍या या उड्डाणपुलाच्‍या कामाची अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांनी गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी प्रत्‍यक्ष पाहणी केली.

केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्‍यात येणारा ‘केबल स्टेड पूल’ हा रेल्वे रूळांवरील महानगरपालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी ८०३ मीटर तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी २३.०१ मीटर इतकी आहे. उड्डाणपुलाच्‍या बांधकामात येणा-या झाडांचे संरक्षण व्‍हावे, यासाठी महानगरपालिकेने उड्डाणपुलाच्‍या संरेखनात योग्य ते बदल केले आहेत.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर म्‍हणाले की, केबल – स्टेड पुलाच्या संरचनेतील ‘पायलॉन’ हा अत्यंत महत्त्वाचा आणि भार वहन करणारा घटक आहे. त्यावर उड्डाणपुलाच्या ‘डेक’ला आधार देणाऱ्या केबल्स ताणलेल्या असतात. प्रस्तावित पुलासाठी ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन उभारण्यात येत असून, ही उंची आणि त्याची रचना अभियांत्रिकीच्या दृष्टीने विशेष आव्हानात्मक आहे. पायलॉनची रचना प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामध्ये उच्च दर्जाचे काँक्रिट व मजबूत पोलादी (Steel) घटकांचा समावेश आहे. वारा, भूकंप, वाहतुकीचा भार तसेच दीर्घकालीन वापर यांचा विचार करून पायलॉनची स्थिरता व टिकाऊपणा सुनिश्चित करण्यात आला आहे. पायलॉन उभारणीसाठी अत्याधुनिक व पायलॉनच्या उंचीपेक्षा अधिक उंच असणारी क्रेन (Crane) कार्यस्थळी स्‍थापित करण्यात आली आहे. या क्रेनच्या सहाय्याने टप्प्याटप्प्याने पायलॉनची उभारणी केली जात आहे. सद्यस्थितीत पायलॉन उभारणीचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे नियोजित वेळापत्रकानुसार प्रगतिपथावर आहेत. उर्वरित पायलॉन उभारणीसह संलग्न कामे दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करावी.

श्री. बांगर म्‍हणाले की, पायलॉनच्या पश्चिम दिशेस ९५ मीटर व पूर्व दिशेस १६५ मीटर असे दोन स्वतंत्र ‘स्पॅन’ प्रस्तावित आहेत. यापैकी पायलॉनच्या पश्चिमेकडील ९५ मीटर लांबीच्या स्पॅनचे काम फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट आहे. तर, पूर्वेकडील १६५ मीटर लांबीचा स्पॅन रेल्वेच्या हद्दीतील जागि रेल्वे विभागाकडून आवश्यक खंड (Block) प्राप्त झाल्यानंतर या स्पॅनची उभारणी करण्यात येणार आहे. हे काम दिनांक १५ मार्च २०२६ ते दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पायलॉनच्या पश्चिम व पूर्व दिशेकडील बहुतांश खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. तथापि, वाहतूक वळविण्याच्या (Traffic Diversion) कामामुळे पाच खांबांची उभारणी अद्याप प्रलंबित आहे. तसेच, पूर्व व पश्चिम दिशेकडील पोहोच रस्त्यांची कामे अद्याप हाती घेण्यात आलेली नाहीत. ही सर्व उर्वरित कामे दिनांक ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. पायलॉन, पुलाचे सेगमेंट तसेच इतर आवश्यक लोखंडी साहित्य वेळेत उपलब्ध होण्यासाठी फॅब्रिकेशन कामांची गती वाढविणे अत्यावश्यक आहे. आवश्यकतेनुसार पर्यायी उत्पादक अथवा पुरवठादारांकडून साहित्याची खरेदी करण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून कामाचा वेग वाढेल व प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करता येईल. स्‍थानिक प्रशासकीय विभाग कार्यालय (Ward Office), वाहतूक पोलिस (Traffic Police) यांच्‍या समन्‍वयाने उड्डाणपुलाचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्‍याचे पूल विभागाचे प्रयत्‍न आहेत. बांधकामासह पुलाची अनुषंगिक कामे दिनांक ३१ ऑक्‍टोबर २०२६ पर्यंत पूर्ण व्‍हायला हवी. यासाठी कामांचे वेळापत्रक निश्चित करावे. शक्‍य असेल तेव्‍हा एकाचवेळी दोन कामे समांतरपणे करावीत, जेणेकरून वेळेची बचत होईल. पावसाळ्यात कामे थांबणार नाहीत, अशादृष्‍टीने नियोजन करावे, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले आहेत.
उप आयुक्‍त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळ्ये यांसह संबंधित अभियंते उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *