भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे १५ मार्चला भव्य सामूहिक विवाह सोहळा

 भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे १५ मार्चला भव्य सामूहिक विवाह सोहळा

उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष ; ५१ जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प

पुणे : सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू कुटुंबांना आधार देणाऱ्या भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा भव्य सामूहिक विवाह सोहळा यंदा रविवार, १५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे विश्वस्त राजेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जयकिशन गोयल,  सरस्वती गोयल, महावीर रतनलाल गोयल,  विनोद अग्रवाल,  सीमा अग्रवाल,  मनोज अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते. 

आजच्या काळात वाढत चाललेल्या सामाजिक व आर्थिक विषमतेच्या पार्श्वभूमीवर सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांतून खऱ्या अर्थाने मानवसेवा घडते, असे मत अग्रवाल यांनी व्यक्त केले. हा सोहळा ज्येष्ठ समाजसेवक रतनलाल गोयल यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले की, सध्या विवाह समारंभांवरील अवाजवी खर्चामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडत आहेत. विशेषतः मुलीच्या विवाहाची चिंता पालकांसाठी मोठे ओझे ठरत आहे. अशा परिस्थितीत सामूहिक विवाह सोहळे समाजात एकात्मता, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीचा सकारात्मक संदेश देणारे ठरतात.

या सोहळ्यात विवाहबंधनात अडकणाऱ्या प्रत्येक जोडप्याला कपाट, पंखा, गादी, चादर, मिक्सर, देव्हारा तसेच भांडी-कुंडी संच असे गृहउपयोगी साहित्य भेटस्वरूप देण्यात येणार आहे. यासोबतच वधू-वरांना संपूर्ण वस्त्रसंच, मंगलसूत्र व आवश्यक वैवाहिक साहित्य देखील प्रदान करण्यात येईल.

हा धार्मिक विधी हिंदू संस्कृतीनुसार पार पडणारा विवाह सोहळा तीन एकर परिसरात पसरलेल्या भव्य अशा गोयल गार्डन, आईमाता मंदिरासमोर, गंगाधाम रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष असून, मागील वर्षी २५ जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या पार पडले होते. मागील १२ वर्षात २४१ जोडप्यांचे विवाह या सोहळ्यात लावण्यात आले आहेत. यंदा ५१ जोडप्यांचे विवाह लावण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी विवाह नोंदणी पूर्णतः मोफत असून, पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व नाशिक परिसरातील इच्छुक व गरजू जोडप्यांनी ९०४९९९२५६० / ९४२२०२५०४९  या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोयल कुटुंबाच्या सामाजिक जाणिवेतून साकारलेला हा उपक्रम गरीब, निराधार व सर्वसामान्य समाजघटकांना सन्मानाने वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करण्याची सुवर्णसंधी देईल, असा विश्वास राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केला.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *