शहराच्या मध्यभागी कोसळलं भारतीय हवाई दलाचं विमान
प्रयागराज, दि. २१ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज सकाळी भारतीय हवाई दलाचे एक प्रशिक्षण विमान अचानक कोसळले. हे विमान शहराच्या मध्यभागी असलेल्या केपी कॉलेज परिसरामागील तलावात आदळले. विमान हवेत असताना अचानक नियंत्रण सुटल्याने ते थेट दलदलीच्या तलावात कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विमान खाली पडताच जोरदार आवाज झाला आणि स्थानि क नागरिकांनी तातडीने पोलिस व प्रशासनाला कळवले. प्रयागराज शहरातील माघ मेळा मैदानापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली,
फायर ब्रिगेड व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तलाव दलदलीचा व जलकुंभीने व्यापलेला असल्याने विमानापर्यंत पोहोचणे कठीण झाले. मात्र, दोन्ही पायलटांनी अपघात होण्यापूर्वीच पॅराशूटच्या साहाय्याने उडी घेतली व ते सुरक्षितपणे बाहेर पडले. त्यांना बचाव पथकाने तातडीने बाहेर काढले.
या अपघातामुळे शहर हादरले असले तरी मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी भारतीय हवाई दलाचा हेलिकॉप्टरही दाखल झाला असून संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान कोसळण्यापूर्वी ते हवेत डगमगत होते.
सध्या या अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे नियंत्रण सुटले असावे. प्रशासनाने नागरिकांना अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे.
SL/ML/SL