खरे शंकराचार्य आहात हे सिद्ध करा – अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस
प्रयागराज, दि. २० : प्रयागराज माघ मेळ्यात रथ थांबवल्याच्या निषेधार्थ धरणे धरून बसलेल्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या ‘शंकराचार्य’ पदवीवर वाद निर्माण झाला असून प्रशासनाने त्यांना औपचारिक नोटीस दिली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी खरे शंकराचार्य असल्याचे सिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मेळा प्राधिकरणाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस देत विचारले आहे की, ते कोणत्या आधारावर स्वतःला ज्योतिषपीठाचा शंकराचार्य म्हणवत आहेत. प्रशासनाने यासाठी सुप्रीम कोर्टाच्या २०२२ मधील स्थगन आदेशाचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये या पदवीसंदर्भातील वाद अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे नमूद केले आहे.
या नोटीसमध्ये अविमुक्तेश्वरानंद यांना २४ तासांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे मेळ्यातील वातावरण तापले असून हा वाद आता “स्वामी विरुद्ध सिस्टम” अशा स्वरूपात उभा राहिला आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रशासनावर भेदभावाचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “आम्ही परंपरेनुसार शंकराचार्य आहोत, मात्र प्रशासन आमच्या पदवीवर प्रश्न उपस्थित करत आहे. हा संत परंपरेचा अपमान आहे.”
SL/ML/SL