उंटाच्या दुधावर प्रक्रिया करणारा देशातील पहिला प्लॅन्ट
अहमदाबाद, दि. २० : देशातील पहिला उंटाच्या दुधावर प्रक्रिया करणारा प्लॅन्ट गुजरातमध्ये सुरू झाला असून यामुळे उंटपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. हा प्लॅन्ट कच्छ जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ज्याला सरहद डेअरी म्हणून ओळखले जाते, यांच्या वतीने स्थापन करण्यात आला आहे.
भुजस्थित या डेअरीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात दररोज सरासरी ४,७५४ लिटर उंटाचे दूध संकलित केले. या कालावधीत डेअरीने उंटपालक शेतकऱ्यांना एकूण ८.७२ कोटी रुपये दिले. गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाचा लाभ ३५० हून अधिक उंटपालक कुटुंबांना झाला आहे.
सरकारी निवेदनात म्हटले आहे की, “२०२४-२५ मध्ये दररोज उंटाचे दूध संकलन ४,७५४ लिटरपर्यंत पोहोचले. वार्षिक देयक म्हणून ८,७२,८३,४४० रुपये ३५० कुटुंबांना देण्यात आले.”
या प्लॅन्टमुळे उंटपालकांना स्थिर उत्पन्नाचा स्रोत मिळाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे. उंटाच्या दुधाला औषधी गुणधर्म असल्याने त्याची मागणी वाढत आहे. गुजरात सरकारच्या या उपक्रमामुळे उंटपालन व्यवसायाला नवा उभारी मिळणार आहे. सरहद डेअरीचा हा प्लॅन्ट देशातील उंटपालकांसाठी आर्थिक स्थैर्य आणि नव्या संधींचा मार्ग ठरला आहे.
SL/ML/SL