वसईनजिक समुद्रात रहस्यमय रिंगण, मच्छिमार भयभीत
पालघर, दि. १९ : वसई किनाऱ्यापासून सुमारे ६६ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात गेल्या दहा दिवसांपासून एक रहस्यमय गोलाकार रिंगण दिसून येत आहे. मासेमारी करून परत येणाऱ्या स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास ही विचित्र घटना आली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
वसई, विरार भागातून मोठ्या संख्येने बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. नुकताच वसईच्या पाचूबंदर येथील एक मासेमारी नौका मासेमारीसाठी गेली होती. यावेळी या बोटीतील सदस्यांना खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले होते. या रिंगणाचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या घडलेल्या प्रकारानंतर यंत्रणा सजग झाल्या आहेत. तर मच्छिमार बांधवामध्ये चिंतेचे वातावरण आहे. याची माहिती मत्स्य अधिकाऱ्यांना दिल्यानंतर याबाबत तटरक्षक दल आणि नौदलाला कळवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच वसईहून गेलेली एक मासेमारी नौका या गोलाकार वर्तुळात अडकली होती. मात्र सुदैवाने नौकेच्या चालकाने प्रसंगावधान राखत, इंजिनचा वेग वाढवून नौका सुरक्षितपणे बाहेर काढली. कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची ही नौका समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. जीपीएस क्रमांक ३०-१५-५५४, ७१-५८-५७६ याठिकाणी मोठे गोलाकार वर्तुळ तयार झाले होते. या रिंगणातून मातेरी रंगाचे पाणी निदर्शनास आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. मात्र, या घटनेनंतर मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून हा प्रकार समुद्राखालील ज्वालामुखी हालचालींशी संबंधित असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे.
SL/ML/SL