या राज्यात सुरू होतोय जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्लांट
काकिनाडा, दि. १७ : आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा हिरवा अमोनिया आणि हायड्रोजन उत्पादन प्रकल्प सुरू होतोय. हा ‘एएम ग्रीन’ नावाचा उपक्रम असून यात विद्यमान अमोनिया-युरिया युनिटला हिरव्या अमोनियाच्या कॉम्प्लेक्समध्ये रूपांतरित केले जाणार आहे. हा प्रकल्प जर्मनी, जपान आणि सिंगापूर सारख्या देशांना ग्रीन एनर्जी पुरवण्यासाठी महत्त्वाचा आहे. या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पात एकूण 10 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 83000 कोटी रुपये गुंतवणूक होत आहे. ही रक्कम भारतातील सर्वात मोठ्या क्लीन एनर्जी उपक्रमांपैकी एक आहे. गुंतवणूकदारांमध्ये परदेशी आणि स्थानिक भागीदार आहेत.
प्रकल्पाची पूर्ण क्षमता दरवर्षी 1.5 दशलक्ष टन ग्रीन अमोनिया उत्पादनाची आहे. यात7.5 गिगावॅट सौर आणि पवन ऊर्जा उत्पादन, 1950 मेगावॅट इलेक्ट्रोलाइजर आणि पंप हायड्रो स्टोरेज समाविष्ट आहे, जे २ गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेची २४ तास पुरवठा सुनिश्चित करेल.
आंध्र प्रदेशच्या ‘इंटिग्रेटेड क्लीन एनर्जी पॉलिसी 2024’ अंतर्गत हा राज्याला ग्रीन हायड्रोजन आणि अमोनियाचे केंद्र बनवण्यात मदत करेल. यामुळे ऊर्जा आयातीवर अवलंबित्व कमी होईल आणि भारताची पहिली ग्रीन ऊर्जा निर्यात सुरू होईल. हा उपक्रम पर्यावरणस्नेही ऊर्जा उत्पादनासाठी एक मोठा पाऊल आहे.
हा प्रकल्प ‘एएम ग्रीन’ कंपनीच्या नेतृत्वात सुरु होतोय. ज्यात मलेशियाची जेंटारी, सिंगापूरची सरकारी संपत्ती निधी जीआयसी आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यांचा सहभाग आहे. या कंपन्या एकत्र येऊन ग्रीन एनर्जी उत्पादनात गुंतवणूक करत आहेत. ‘एएम ग्रीन’ने जर्मनीच्या युनिपर कंपनीसोबत लॉंगटर्म पुरवठा करार केलाय. तर जपान आणि सिंगापूरमधील संभाव्य खरेदीदारांसोबत चर्चा सुरू आहेत. याद्वारे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान मिळू शकणार आहे.
SL/ML/SL