मुंबईत महायुतीचाच मराठी महापौर होईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, 15 – मुंबईत ठाकरे बंधु विरुध्द महायुतीचा सामना रंगलेला असला तरी मुंबईत महायुतीला विजय सोपा आहे. मुंबईतील मराठी जनता महायुतीला मतदान करेल, त्यासोबत मुंबईतील दाक्षिणात्य, गुजराती, उत्तर भारतीय, सर्व गैरमराठी जनता ही महायुतीला मतदान करणार असल्यामुळे मुंबईत महायुतीचीच हवा असून मुंबईत महायुतीचाच मराठी महापौर होईल, असा विश्वास आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. आज बांद्रा पूर्व येथील नवजीवन विद्यामंदीर येथे केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सहकुटुंब मतदान केले.यावेळी त्यांच्या पत्नी सौ. सीमाताई आठवले, पुत्र जित आठवले, तसेच रिपब्लिकन पक्षाचे वॉर्ड क्रमांक 93 चे उमेदवार सचिन कासारे, रिपाइंचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार उपस्थित होते.
राज्यातील 29 पैकी 26 महापालिका महायुती जिंकेल असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. मुंबईत आज सकाळी मतदानाचे प्रमाण अत्यल्प होते. ना. रामदास आठवले यांनी जनतेने मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले पाहिजे असे आवाहन केले. मतदानाचा असला कमी टक्का तरी महायुतीचा विजय आहे पक्का, असे ना. रामदास आठवले म्हणाले.
मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे, निवडणुकीत किमान 90 टक्के मतदान झाले पाहिजे. त्यासाठी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते पार पाडण्यासाठी सक्तीच्या मतदानाचा संसदेने कायदा केला पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले. आजारी रुग्ण आणि ज्येष्ठांनाही मतदानाच्या सुविधा घरपोच पुरविण्यासाठी निवडणुक आयोगाने विचार केला पाहिजे. मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.KK/ML/MS