भटके कुत्रे चावल्यास राज्य सरकारला द्यावी लागणार भरपाई
नवी दिल्ली, दि.14 : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत राज्य सरकारांच्या ढिल्या कारभाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. भटक्या प्राण्यांबाबतच्या नियमांची गेल्या 5 वर्षांपासून अंमलबजावणी न झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.कुत्र्याने चावा घेतल्यास, एखाद्याचा मृत्यू झाल्यास किंवा मुले आणि वृद्धांना इजा झाल्यास आता संबंधित राज्य सरकारला मोठी नुकसानभरपाई द्यावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हा इशारा दिला आहे
न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, केवळ सरकारच नाही तर रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालणारे आणि त्यांचे समर्थन करणारे लोकही अशा घटनांसाठी जबाबदार असतील.
न्यायमूर्ती नाथ म्हणाले, “जर तुम्हाला या प्राण्यांबद्दल इतकेच प्रेम असेल, तर तुम्ही त्यांना तुमच्या घरी का घेऊन जात नाही? हे कुत्रे रस्त्यावर फिरून लोकांना का चावत आहेत आणि भीती का घालत आहेत? अशा घटनांसाठी आता उत्तरदायित्व निश्चित केले जाईल.”
एका 9 वर्षांच्या मुलावर झालेल्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा उल्लेख करत न्यायमूर्ती मेहता यांनी विचारले की, अशा वेळी कोणाला जबाबदार धरायचे? ज्या संस्था त्यांना खाऊ घालतात त्यांना का? तुम्ही आम्हाला या गंभीर समस्येकडे डोळेझाक करायला सांगत आहात का? गेल्या काही वर्षांत भटक्या प्राण्यांना संस्थात्मक भाग आणि रस्त्यावरून हटवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारांना धारेवर धरले.
SL/ML/SL