इराणमधील भारतीयांना तत्काळ देश सोडण्याचे आवाहन
नवी दिल्ली, दि. 14 :
भारत सरकारने इराणमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी करत सर्व भारतीयांना सुरक्षिततेसाठी इराणमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता भासल्यास त्वरित भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.आणीबाणीच्या काळात मदतीसाठी भारतीय दूतावासाने काही मोबाईल नंबर देखील जारी केले आहेत. या नंबरवर भारतीय नागरिक संपर्क साधू शकतात: +989128109115, +989128109109, +989128109102 आणि +98932179359.
इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र आंदोलन, निदर्शने आणि हिंसाचार सुरू असून परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी नवी सूचना जारी केली. या सूचनेत भारतीय नागरिकांना इराणला प्रवास टाळण्याचे तसेच जे नागरिक सध्या इराणमध्ये आहेत त्यांनी तातडीने देश सोडण्याचे आवाहन केले आहे. दूतावासाने विद्यार्थ्यांना, पर्यटकांना, व्यावसायिकांना आणि यात्रेकरूंना उपलब्ध असलेल्या सर्व वाहतूक साधनांचा वापर करून इराण सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
सूचनेत भारतीय नागरिकांनी प्रदर्शनस्थळे आणि हिंसाचारग्रस्त भाग टाळावेत, स्थानिक माध्यमांद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवावे, तसेच दूतावासाशी सतत संपर्कात राहावे असे स्पष्टपणे सांगितले आहे. दूतावासाने आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी देखील जाहीर केले आहेत, ज्याद्वारे नागरिकांना मदत मिळू शकते. तसेच सर्व भारतीयांनी वैध प्रवास व ओळखपत्रे नेहमी सोबत ठेवावीत, अशी सूचना करण्यात आली आहे.
इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात तब्बल 2 हजार लोकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातील बिघडलेली आर्थिक स्थिती आणि सामाजिक बंधने यामुळे आंदोलन केले जात आहे.
SL/ML/SL