अमेरिकेने रद्द केले 1 लाख परदेशी Visa
न्यूयॉर्क, दि. १३ : वर्ष 2025 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने विक्रमी संख्येने परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. ट्रम्प प्रशासनाच्या कारवाईत तब्बल 1 लाखांहून अधिक व्हिसा रद्द झाले, जे 2024 मधील 40 हजारांच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आहेत. यात 8 हजार विद्यार्थी आणि 2,500 विशेष श्रेणीतील कामगारांचा समावेश होता. बहुतेक प्रकरणे व्यवसाय व पर्यटक व्हिसाशी संबंधित होती, ज्यात प्रवाशांनी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहून नियमांचे उल्लंघन केले.
फॉक्स न्यूजच्या माहितीनुसार, विशेष कामगारांमध्ये 50% प्रकरणे मद्यपान करून वाहन चालवण्याशी, तर 30% मारामारी व हल्ल्याशी संबंधित होती. उर्वरित प्रकरणांमध्ये चोरी, अमली पदार्थ, मुलांशी गैरवर्तन व फसवणूक यांचा समावेश होता. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, शेकडो विद्यार्थी व कामगारांविरुद्ध गुन्हेगारी आरोपांमुळे व्हिसा रद्द करण्यात आले. याशिवाय, ट्रम्प प्रशासनाने ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेत वैध व्हिसा असलेल्या 5.5 कोटी परदेशी नागरिकांची समीक्षा करण्याची घोषणा केली होती.
भारतावर होणारा परिणाम
अमेरिकेने 2025 मध्ये विक्रमी संख्येने व्हिसा रद्द केल्याचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. हजारो भारतीय विद्यार्थी व आयटी/विशेष कामगार प्रभावित झाले असून, शिक्षण, रोजगार आणि द्विपक्षीय संबंधांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत दरवर्षी 2 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी हजारो विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द झाल्याने त्यांचे शिक्षण खंडित झाले आहे.
सुमारे 500 भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये रद्द झाले, ज्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.
यामुळे भारतीय पालक व विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेत शिक्षण घेण्याबाबत अनिश्चितता व भीती वाढली आहे.
SL/ML/SL