ट्रम्प यांनी स्वतःला घोषित केले व्हेनेझुएलाचे अॅक्टिंग प्रेसिडेंट
न्यूयॉर्क :
व्हेनेझुएलामध्ये गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकट, महागाई, आणि राजकीय अस्थिरता वाढली आहे. तेलसंपन्न असलेल्या या देशात लोकशाही व मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप अमेरिकेने वारंवार केला आहे. ट्रम्प यांच्या धोरणामागे राजकीय लोभ आणि तेलसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा असल्याचे अनेक विश्लेषकांचे मत आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना काही दिवसांपूर्वीच अटक केल्यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर स्वतःला थेट “व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष” असल्याचे जाहीर करणारी पोस्ट केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. रविवारी केलेल्या या पोस्टमध्ये ट्रम्प यांचा अधिकृत फोटो असून त्याखाली “ “व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष, जानेवारी २०२६ पर्यंत पदावर (Acting President of Venezuela, Incumbent January 2026)” असा उल्लेख करण्यात आला आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख अमेरिकेचे ४५वे आणि ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणूनही केला असून, २० जानेवारी २०२५ रोजी पदभार स्वीकारल्याचे नमूद आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठी कारवाई करत देशाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले होते. मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना न्यूयॉर्कला नेण्यात आले असून, त्यांच्यावर अंमली पदार्थ आणि दहशतवादाशी संबंधित कटाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.