जुहू परिसरात ३५ हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

 जुहू परिसरात ३५ हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

मुंबई, दि. १२ : निवडणूकांच्या दरम्यान दिली जाणारी वारेमाप आश्वासने आणि त्यानंतर निवडून आल्यावर कामाच्या नावाने बोंब, या देशभर बोकाळलेल्या राजकीय प्रवृत्तींच्या वागणुकीला नागरिक कंटाळून गेला आहे. याचाच प्रत्यय आता मुंबई मनपाच्या निवडणूकाच्या निमित्ताने सुरू असलेल्या रणधुमाळीत आला आहे. मुंबईतील जुहू भागातील तब्बल ३५ हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जुहू परिसरातील जवळपास २०० निवासी इमारतींमधील रहिवाशांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या नाराजीमुळे नागरिकांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, वाहतूक कोंडी, तसेच नागरी सुविधांबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढल्याचे चित्र आहे.

या निर्णयाची जाहीर सूचना देण्यासाठी जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी आणि आसपासच्या परिसरात मतदान बहिष्काराचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. या बॅनरद्वारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष स्थानिक समस्यांकडे वेधण्याचा प्रयत्न रहिवाशांकडून केला जात आहे. “आमच्या मूलभूत प्रश्नांची दखल घेतली जात नाही, त्यामुळे मतदान करूनही काही बदल होत नाही,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रशासनासाठी ही बाब आव्हानात्मक ठरत असून, निवडणुकीपूर्वी नागरिकांशी संवाद साधून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदान हा महत्त्वाचा अधिकार असला, तरी स्थानिक पातळीवरील असमाधानामुळे नागरिकांनी बहिष्काराचा मार्ग निवडणे ही बाब गंभीर मानली जात आहे.

मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या लष्करी रडार व्यवस्थेमुळे स्थानिक नागरिकांना गेली अनेक दशके विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. या रडारच्या मर्यादांमुळे परिसरातील इमारतींच्या उंचीवर तसेच पुनर्विकास प्रक्रियेवर निर्बंध येत असून, त्याचा थेट परिणाम येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेवर आणि जीवनमानावर होत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून जुहू परिसरातील जवळपास २०० इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. यासोबतच या भागातील दोन झोपडपट्ट्यांचाही विकास होऊ शकलेला नाही. परिणामी, सुमारे ३५ हजार नागरिक अतिशय जीर्ण आणि असुरक्षित इमारतींमध्ये भीतीच्या छायेखाली राहण्यास मजबूर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात इमारतींची अवस्था अधिकच धोकादायक बनते, तर दररोजच्या जीवनातही जीविताला धोका निर्माण होण्याची भावना नागरिकांमध्ये कायम आहे.

या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जुहूतील २०० इमारतींमधील रहिवासी आणि दोन झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडे वारंवार दाद मागितली आहे. त्यांनी निवेदनांद्वारे तसेच विविध माध्यमांतून आपल्या अडचणी मांडल्या असून, अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस निर्णय किंवा दिलासा मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *