म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यकारी संचालकपदी अभिराम घड्याळपाटील !
मुंबई दि १२ – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे नवे कार्यकारी संचालक म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि विदेशी वकिलातीतून राजकीय विश्लेषक म्हणून काम केलेले अभिराम घड्याळपाटील यांची नियुक्ती झाली असून येत्या 14 जानेवारीस ते या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. 1982 पासून मुख्यत्वे लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत या आधी सुरुवातीपासून डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आणि नंतर रवींद्र साठे व डॉ. जयंत कुलकर्णी यांनी ही जबाबदारी सांभाळली होती.
अभिराम घड्याळपाटील हे वरिष्ठ पत्रकार असून त्यांना पत्रकारितेचा वीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी दिल्लीमधल्या अमेरिकेच्या भारतातील दूतावासात तसेच मुंबईमधल्या अमेरिकन वकिलातीमध्ये राजकीय सल्लागार म्हणून काम केले. ह्या पदावर असताना अमेरिका-भारत संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांच्या कार्यक्षेत्राचा भाग म्हणून त्यांनी भारताचे राष्ट्रीय राजकारण, राष्ट्रीय सुरक्षा, जम्मू आणि काश्मीरमधील प्रश्न, दहशतवाद, नक्षलवाद, इस्लामिक कट्टरपंथी विचार आणि संघटना, भारतामधले धार्मिक स्वातंत्र्य, आणि क्षेत्रीय तसेच जात-आधारित राजकारणाचा अभ्यास केला. त्याआधी त्यांनी भारतातल्या ब्रिटिश उच्चायुक्तामध्ये राजकीय सल्लागार म्हणूनही काम केले आहे. पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, इकोनॉमिक टाइम्स, हिंदुस्थान टाइम्स, आणि मिंट या सारख्या वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगड या राज्यांमधल्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर वार्तांकन केले आहे. मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोड्याचे असलेले घड्याळपाटील पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्याचे स्नातकोत्तर पदवीधर आहेत.ML/ML/MS