सत्तेच्या गणितात भाजपची नैतिकता शून्य
ॲड. श्रीनिवास बिक्कड
देशात आणि राज्यात मूळ संघ, भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेच पक्षात अल्पसंख्यांक झाले आहेत. ज्यांनी कठीण काळात पक्ष वाढवला, संकटात झेंडे हातात घेतले, सत्ता नसताना उपेक्षा आणि अपमान सहन केले.
असंगाशी संग आणि विचारांना तिलांजली ही स्वत:ला पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपची सध्याची स्थिती आहे. नैतिकता, शूचिता आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचे गोडवे गाणाऱ्या भाजपने या घोषणेला तिलांजली दिल्याचे दिसत आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपच्या लोकांनी एखाद्या हत्याराप्रामणे नैतिकतेचा वापर केला आणि आज सत्ता मिळवणे आणि टिकवण्यासाठी भ्रष्ट अनैतिक लोकांचा आणि पद्धतींचा वापर करून नैतिकतेला फासावर लटकवले आहे. घराणेशाही, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सातत्याने काँग्रेसला शिव्या देणाऱ्या भाजपची नैतिकता सत्तेच्या अवघ्या १० वर्षांत पार रसातळाला गेली. नगरपालिका निवडणुका ज्या पद्धतीने लढवल्या आणि निकालानंतर ज्या पद्धतीने आघाड्या केल्या त्या भाजपचे खरे रूप दाखवतात.
अकोटमध्ये भाजप-एमआयएमचे गळ्यात गळे
नगरपालिका निवडणुकीत सत्ता आणि पैशाचा महापूर आणून भाजपने राज्यात सर्वात जास्त नगरपालिकांत विजय मिळवला. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष आणि विषय समित्यांच्या निवडीसाठी एमआयएम या पक्षाशी आघाडी केली. ज्या एमआयएमला भाजपचे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते दररोज शिव्या घालतात त्या एमआयएमच्या गळ्यात गळा घालून भाजपने शहर विकास मंच आघाडीची स्थापना केली. भाजपच्या या ढोंगीपणावर टीका झाल्यावर एमआयएम प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांनी आघाडी तोडण्याचे आदेश त्यांच्या स्थानिक पदाधिकारीऱ्यांना दिले. भाजपने फक्त दिखाव्यासाठी काही जणांना नोटीस दिल्या. पण आघाडी तोडली नाही. त्यामुळे आजही भाजप- एमआयएमची युती अस्तित्वात आहे. अकोटसारख्या एका छोट्या नगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने केलेली ही अभद्र युती पाहता भाजप सत्तेसाठी काय करू शकतो याची आपल्याला कल्पना येते.
बदलापूर-अंबरनाथ पॅटर्न
बदलापूर नगरपालिकेत सत्ता मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शाळकरी मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केली. आपटे जेलमध्ये असायला हवा होता. भाजपने त्याला नगरपालिकेच्या सभागृहात नेऊन बसवले. बलात्काराच्या प्रकरणात जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या लोकांचे सत्कार करणाऱ्या पक्षाने छोट्या मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करत आम्ही असेच आहोत हे पुन्हा दाखवून दिले आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने काँग्रेस पक्षाच्या एका स्थानिक नेत्यावर दबाव आणून त्याला फोडून काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन आघाडीची स्थापना केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधितांना निलंबित केले. पण भाजपने त्या नगरसेवकांवर यंत्रणेमार्फत दबाव आणून त्या नगरसेवकांना पक्षात घेतले. निष्ठावंत कार्यकर्त्यांना शून्य किंमत देशात आणि राज्यात मूळ संघ, भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेच पक्षात अल्पसंख्यांक झाले आहेत. ज्यांनी कठिण काळात पक्ष वाढवला, संकटात झेंडे हातात घेतले, सत्ता नसताना उपेक्षा आणि अपमान सहन केले त्यांना आज पक्षसंघटनेत आणि उमेदवारी दुय्यम स्थान दिलं जात असून आजही त्याच यातना भोगाव्या लागत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा इतर पक्षांतून आलेले नेते आज भाजपच्या निर्णयप्रक्रियेवर वर्चस्व गाजवत आहेत. कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट, घराणेशाहीचे प्रतीक, राष्ट्रविरोधी ठरवले जात होते, तेच आज भाजपमध्ये ‘स्वच्छ’, ‘योग्य’ आणि ‘अनिवार्य’ झाले आहेत. राज्यभरात भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते उमेदवारी मिळाली नाही म्हणून आक्रोश करत होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लाखो रुपयांमध्ये उमेदवारीचा सौदा झाल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगत असल्याचे आपण वृत्तवाहिन्यांवर पाहिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीट दिले म्हणून महिला कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. राज्यभरातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश पाहिला तर भाजपमध्ये आता निष्ठावंत कार्यकर्त्यांना किंमत उरली नाही हे स्पष्ट होते. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि नैतिक दिवाळखोर महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात भाजपचे नेते अजित पवारांवर टीका करताना थकत नाहीत. त्यांच्या भाषणांतून, पत्रकांतून आणि सोशल मीडियावरून अजित पवार म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रतीक असल्याचा सूर लावला जातो. पण यात काहीच नवल नाही.
गेली दोन दशके भाजपने हेच राजकारण केले आहे. विरोधी पक्षात असताना अजित पवारांवर बेछूट आरोप करायचे आणि सत्ता आली की त्याच अजित पवारांना सोबत घेऊन सत्तेची मलाई खाण्यासाठी त्याच अजित पवारांना मिठी मारायची. अवघ्या दोन वर्षांपूर्वी भाजपने याच अजित पवारांना आपल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री करून घेतले आणि ढोंगीपणाच्या बाबतीत “आमची बरोबरी कोणीही करू शकत नाही” हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. ज्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा केली जात होती त्यांनाच सत्तेच्या सर्वोच्च खुर्च्यांवर बसवण्यात भाजपला कोणताही संकोच वाटला नाही. आज भाजपला महानगरपालिका निवडणुकांत अजित पवारांच्या पक्षाशी युती नको आहे. कारण स्थानिक राजकारणात त्यांची गरज नाही. पण त्याच भाजपला राज्य सरकार चालवताना अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून हवेत. ही विसंगती नाही तर सत्तेचे गणित जमवण्यासाठी केलेली उघड उघड राजकीय फसवणूक आहे. ढोंगीपणा हा भाजपचा स्थायीभाव झाला आहे. भाजपला अजित पवार चालतात, पण नवाब मलिक चालत नाहीत. मुंबईत एकनाथ शिंदे चालतात, पण पुण्यात चालत नाहीत. जिथे सत्ता मिळते तिथे सगळे पवित्र आणि जिथे सत्ता अडचणीत येते तिथे सगळे भ्रष्ट! हाच सत्तेचा विकार जडलेल्या भाजपचा नवा विचार आहे. यामुळे भाजप खरोखरच राजकीय पक्ष आहे की सत्तेसाठी कुणाशीही, कोणत्याही अटींवर, कोणत्याही प्रकारे घरोबा करणाऱ्या व्यापारी वृत्तीच्या लोकांचा समूह झाला आहे, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांसह जनतेला पडला आहे. तत्त्वे, नैतिकता, भ्रष्टाचार विरोधातील लढा, हिंदुत्व, राष्ट्रवाद हे सगळे मुद्दे भाजपसाठी फक्त प्रचारापुरते आहेत.
प्रत्यक्ष व्यवहारात भाजपचे एकच तत्त्व आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. सत्तेच्या गणितासाठी मित्र बदलणे, सोयीप्रमाणे शत्रू ठरवणे आणि जनतेच्या बुद्धिमत्तेला गृहीत धरून राजकारण करणे, हीच भाजपची कार्यपद्धती असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा सत्ताकेंद्रित, दुटप्पी आणि संधीसाधू राजकारणाचा खेळ मतदार अजून किती काळ सहन करणार, की या निवडणुकांतूनच त्याला ठाम उत्तर देणार, हा खरा निर्णायक प्रश्न आज महाराष्ट्रासमोर उभा आहे.
- माध्यम समन्वयक,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
ML/ML/MS