साताऱ्यातून 30 लाखांचा बनावट खतसाठा जप्त
सातारा, दि. १० : कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) वडूज (ता. खटाव) येथे टाकलेल्या धाडीत लाखो रूपये किंमतीची बनावट खते आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. तसेच कारखाना सील करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. बनावट खतनिर्मिती करणारे रॅकेट सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातही असल्याचा संशय सातारा जिल्हा अधीक्षक कृपी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी व्यक्त केला आहे.
कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाला काही दिवसांपुर्वी फलटण तालुक्यातील टाकळवाडी सोसायटीत बनावट खते आढळून आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने सापळा रचला. बनावट खतांच्या अनुषंगाने गोपनीय चौकशी करत असताना वडूजमधील बनावट खत निर्मिती कारखान्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या कारखान्यावर धाड टाकली. त्याठिकाणी नामांकित कंपन्यांच्या नावाने तयार केलेली बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा साठा आढळून आला.
SL/ML/SL