दुबई वरून आलेल्या इशिता नरेश बोथरा हिने साकारला भरतनाट्यम या अभिजात भारतीय नृत्यप्रकारातून दैदीप्यमान रंगप्रवेश!
मुंबई, 9
नुकताच अभ्युदयनगर येथील शिवाजी विद्यालयाच्या रंगमंचावर स्वर्गीय गांधर्व नृत्याचा अविस्मरणीय असा संगीत सोहळा रसिक प्रेक्षकांनी प्रत्यक्ष अनुभवला.
नृत्यकथेला पोषक अशी अप्रतिम प्रकाश योजना आणि नैपथ्य यामुळे जणू स्वर्गामधल्या इंद्राच्या दरबारातील संगीत नृत्याचा आविष्काराचे आपण साक्षीदार आहोत अशी उपस्थित प्रेक्षकांना प्रचिती घेता आली.
पौराणिक कथांवर आधारित भरतनाट्यम या नाट्य प्रवेशातून नृत्य दिग्दर्शक आणि नाट्याचार्य रेशमी पथीयाथ यांच्या मार्गदर्शनाखाली इशिताने कथानक रंगमंचावर साकारले.
इशिताला वयाच्या पाचव्या वर्षापासून आई किरणने नृत्य साधनेसाठी प्रोत्साहित केले होते.
सहज सुंदर अभिनयाची जोड असलेला नृत्याविष्कार,प्रत्येक ताल अन् गुरुंसमवेत प्रत्यक्ष स्वराधिश अन् वादक यांनी आसमंतात नादब्रह्म आळवित असतानाच तिच्या अलगद हालचालींनी आणि नवरसभरीत भावनांच्या अदाकारीने रसिक प्रेक्षकांवर अक्षरशः रोमांच उभे राहिले होते
सुमधुर संगीतात रागमलिका आळवित पुष्पांजलीने नृत्य सोहळ्यास प्रारंभ झाला. दाक्षिणात्य पेहरावातील लाजवाब साजश्रृंगार बासरी, मृदंग आणि व्हायोलीनच्या साथीने स्वरांनी जणू अवकाशाला गवसणी घातली. नादब्रह्मात नृत्यसम्राज्ञी थिरकली अन् साक्षात अदभुत विश्वाची अनुभूती झाली.
जतिस्वरम्, पदम्, कीर्तनम्, शिवस्तुती, वर्णम्, अभंग अष्टपदी, भजन, थिल्लाना सांगतेला मंगलम्.विठ्ठलाच्या अभंगात लीन होणे असो की नवरसांची अनुभूती घेणे असो. इतकंच काय तर अच्युतमं केशवमं असो, ज्यात शबरी, मा यशोदा आणि प्रेमवेडी राधा इशिताने अगदीच लीलया साकारल्या.
निवेदिका ज्योती राणे यांनी कथानक इतक्या सुलभपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवले की नंतर सादर होणाऱ्या प्रत्येक नृत्याचा आनंद विलक्षण अनुभूती प्रेक्षकांना देऊन गेला.
केरळ वरून खास आलेले गायक विद्वान श्री प्रियदास कोप्पम,
मृदंगमवर विद्वान श्री संजय कुमार,बांसुरी वादक विद्वान श्री श्रीहरि कोट्टक्कल,वायलिनवादक विद्वान सी.आनंदकृष्णन,नट्टुवांगम आणि श्रीमती रेश्मी पथियाथ यांचे अप्रतिम संगीत आणि गायन या नृत्याला पोषक असेच होते.
नर्तन क्षेत्रातील अनेक दिग्गजानी या संगीत दरबारात हजेरी लावली होती.
शिवाजी विदयालय संचालिका गौरवी लोकेगावकर,कथ्थक नृत्यांगना रेखा घोलप, भरतनाट्यम ह्या नृत्यप्रकाराचा प्रसार करीत असलेली अपेक्षा घाटकर तसेच बॉलिवूड कलाकार सोनिया श्रीवास्तव आदी कलाप्रेमी रसिकांची हजेरी लक्षणीय होती.KK/ML/MS