ज्येष्ठ पत्रकार सच्चिदानंद उर्फ बापू महाडिक यांना सर्वदचा जीवन गौरव
मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ पत्रकार, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस आणि तरुण पालघर चे संपादक सच्चिदानंद उर्फ बापू महाडिक यांना सर्वद फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. हा सोहळा पालघर जिल्ह्यातील विसावा रिसॉर्ट, केळवे येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थांच्या गीताने झाली.
सुप्रसिद्ध समाजसेवक, वक्ते प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ पत्रकार सच्चिदानंद उर्फ बापू महाडिक आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा. अशोक ठाकूर यांना सर्वद तर्फे सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात त्यांच्या वरील चित्रफीत दाखविण्यात आली. “दिग्गज मंडळींना पुरस्कार प्रदान करणे म्हणजे एका अर्थाने माझाच सन्मान आहे”, अशा शब्दांत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर आपल्या शब्दसंपन्न प्रास्ताविकातून सर्वद ची उद्दिष्टे, कार्यक्रमाचा हेतू संचालिका डॉ. सुचिता पाटील यांनी विषद केला.
सच्चिदानंद उर्फ बापू महाडिक आणि प्रा. अशोक ठाकूर यांनी आपापल्या जीवनाची वाटचाल सांगून सर्वदला धन्यवाद दिले. मूळ केळवे गावचे रहिवासी सच्चिदानंद उर्फ बापू महाडिक यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर प्रारंभी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथे सेवा केली. नंतर सचिवालयात गृहविभागात दहा वर्षे नोकरी केली. अनेक वर्षे शिवसेना नेते, लोकसभेचे माजी सभापती डॉ. मनोहर जोशी यांचे स्वीय सचिव म्हणून काम केले. एका बाजूला हे करीत असतांनाच त्यांनी मराठी पत्रकारितेची भरीव सेवाही तरुण पालघर या साप्ताहिकाच्या माध्यमातून सुरुच ठेवली. पालघर हे ठाणे जिल्ह्यात असतांना बापूंनी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यही केले. या पुरस्कार सोहोळ्याचे सूत्रसंचालन रुपाली राऊत यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.ML/ML/MS