जर्मनीच्या बँकेतून ₹290 कोटींची चोरी
बर्लिन, दि. 31 : जर्मनीतील गेल्सेंकिर्चेन शहरातील स्पार्कस बँकेत तब्बल २९० कोटी रुपयांची चोरी झाली. चोरट्यांनी पार्किंग गॅरेजच्या भिंतीतून मोठे भगदाड पाडून थेट तिजोरीपर्यंत प्रवेश केला आणि ३,२५० पेक्षा जास्त लॉकर फोडून रोकड व दागिने लंपास केले. ही घटना ख्रिसमस सुट्टीत घडली, जेव्हा परिसर शांत होता. चोरीचा उलगडा २९ डिसेंबरला फायर अलार्म वाजल्यानंतर झाला. तपासात समोर आले की, चोरांनी मोठ्या ड्रिल मशीनचा वापर केला होता.
स्थानिकांनी मुखवटा घातलेल्या लोकांना मोठ्या पिशव्या घेऊन जाताना पाहिले होते, तर सीसीटीव्हीमध्ये काळ्या रंगाची ऑडी RS6 कार दिसली. पोलिसांनी या चोरीची तुलना ‘ओशन इलेव्हन’ चित्रपटाशी केली असून, ती दीर्घ नियोजनानंतरच शक्य असल्याचे म्हटले आहे. बँकेने ग्राहकांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले असून, पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.