बंद एनटीसी मिलच्या प्रश्नावरील आंदोलनाला गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचा पाठिंबा
मुंबई, दि ३१: गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची आज राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये आढावा बैठक पार पडली.या बैठकीत मुंबईतील एमटीसीच्या या बंद चार गिरण्यांमधील कामगारांना गेले नऊ महिने पगार नाही, यावर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या चार गिरण्यातील कामगारांबाबत केंद्र सरकारने जराही दया दाखविलेली नाही, या प्रश्नावर बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला असून, गिरणी कामगार सेनेचे बाळ खवणेकर यांनी रामिम संघाच्या पाठिंब्याचा ठराव मांडला आणि संपूर्ण सभेने या आंदोलनाला पाठींबा दिला आहे .
बंद एनटीसी गिरण्या पूर्ववत चालवा,९ महिन्यांचा थकीत पगार त्वरित द्या आणि कामगारांची थकीत देणी मिळालीच पाहिजे,या मागण्यांसाठी चार एनटीसीच्या बंद गिरण्यांतील कामगारांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अधिका-यांना घेराव घालण्याचे २६ डिसेंबर पासून सुरू केलेले आंदोलन अद्याप निर्धाराने सुरूच ठेवले आहे.मागण्यांवर सकारात्मक निर्णय होई पर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.हे आंदोलन प्रथम दादरच्या टाटा मिलवर जोरदारपणे करण्यात आले.आता कामगारांचे हे आंदोलन (१)इंदू मिल क्रमांक ५, (२) पोदार,(३) दिग्विजय आणि (४) टाटा मिलमध्ये स्वतंत्रपणे नेटाने चालूआहे. संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आणि सर्व संघटन सेक्रेटरी च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. महिला प्रतिनिधी आणि कामगार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
देशात कोविड महामारी 2020 मध्ये सुरू झाली.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन सुरू केले.परंतु ते विशिष्ट मुदतीत संपविण्यात येऊन,अनेक उद्योगधंदे सुरू झाले.परंतु देशातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एनटीसीच्या 23 गिरण्या अद्याप बंदच ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहेर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या बंद गिरण्यातील कामगारांचा लढा उभा करून, कामगारांची वेदना सरकारच्या लक्षात आणून दिली होती. या प्रश्नावर लोकसभेतही आवाज उठविण्यात आला होता.परंतु सरकारने नरोवा कुंजरोवाची भूमिका घेऊन हा प्रश्न अनिर्णित अवस्थेत ठेवला,या संदर्भात आजच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या बैठकीत नापसंती आणि संताप व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नेतृत्वाने कामगारांच्या थकीत पगारसह हा प्रश्न न्यायालयात नेला.न्यायालयाने कामगारांना मागील पगार देण्याचा आदेश देऊनही व्यवस्थापनाने तो पाळलेला नाही. न्यायालयाच्या बेआदबी प्रकरणी संघटना न्यायालयात लढते आहे.दरम्यान संघटना “एनसीएलटी” न्यायधिकरणाद्वारे लढत आहे.
आतापर्यंत अर्ध्या पगारावर कामगार तग धरून होते.परंतु गेल्या नऊ महिन्यापासून पगार न मिळाल्याने कामगार आणि त्यांचे कुटुंबीय उपासमारीचे जीवन जगत आहेत. त्यातून कामगारांमध्ये असंतोष उफाळून आल्याने,एनटीसी अधिकाऱ्यांना घेरावचे आंदोलन कामगारांनी सुरू केले आहे. जोपर्यंत या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे, या भूमिकेला गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने आपला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. गिरणी कामगार घराच्या अनिर्णित प्रश्नावर लवकरच लढा समितीचे प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलनात्मक पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस,लढ्याचे निमंत्रक गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, सर्व श्रमिक संघटनेचे कॉ.विजय कुलकर्णी, हेमन धागा जनकल्याण फाऊंडेशनचे हेमंत गोसावी,संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे रमाकांत बने, विवेकानंद बेलूसे, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे, गिरणी कामगार सभेचे हरिनाथ तिवारी, मुंबई गिरणी कामगार युनियनचे अरुण निंबाळकर, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे नारायण पांचाळ, राजेंद्र साळसकर,दत्ता इस्वलकर गिरणी कामगार घर हक्क समितीच्या वैशाली गिरकर आदींनी सभेत भाग घेतला.KK/ML/MS