राज्यातील हा विमानतळ ग्राहक समाधान सर्व्हेमध्ये देशात प्रथमस्थानी
मुंबई, दि. 30 : छत्रपती संभाजीनगर विमानतळाने देशातील सर्व विमानतळांना मागे टाकत ग्राहक समाधान सर्वेक्षणात पहिला क्रमांक मिळवला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जुलै ते डिसेंबर २०२५ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात ६२ विमानतळांचे मूल्यांकन झाले असून खजुराहो, भोपाळ आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळांना ५ पैकी ४.९९ रेटिंग मिळाले आहे. २०२४ मध्ये १३व्या स्थानी असलेले हे विमानतळ आता पहिल्या स्थानी झेपावले आहे. स्वच्छतागृहांचे नूतनीकरण, ईव्ही चार्जिंग स्टेशन, लायब्ररी, मुलांसाठी प्ले एरिया यांसारख्या सुविधा आणि प्रवासी हाताळण्याची क्षमता ८०० वरून २८५० पर्यंत वाढवणे यामुळे ही प्रगती साध्य झाली. दिवसभरात १०० उड्डाणे घेण्याची क्षमता असूनही ती पूर्णपणे वापरली जात नाही. या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट प्रवाशांच्या अनुभवांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करून ३३ प्रमुख पॅरामीटर्सवर सुधारणा करणे आहे.