इराणमध्येही Gen-Z उतरले रस्त्यावर
तेहरान, दि. 30 : बांग्लादेश, नेपाळ, इंडोनेशियानंतर आता इराणमध्येही Gen-Z रस्त्यावर उतरले आहेत. ताज्या घडामोडींनुसार तेहरान, इस्फहानसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थी व तरुणांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले असून आर्थिक संकट, वाढती बेरोजगारी व मानवी हक्कांचे उल्लंघन याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इराणमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक असंतोष वाढत आहे. कामगार, निवृत्त नागरिक आणि युवक यांनी मिळून सरकारच्या दडपशाही धोरणांविरोधात आवाज उठवला आहे. काझ्विन शहरातील स्टेडियममध्ये युवकांनी हुकूमशाहीविरोधी घोषणाबाजी केली. “स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य” अशा घोषणा देत त्यांनी लोकशाहीची मागणी केली.
इराणच्या सरकारने गेल्या काही आठवड्यांत मोठ्या प्रमाणावर फाशीच्या शिक्षा दिल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्या सहा दिवसांतच ३३ जणांना फाशी देण्यात आली, तर अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्या कार्यकाळात एकूण ६७८ फाशी झाल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर युवकांनी तेहरानमधील खुमैनी रिलीफ कमिटी मुख्यालयावर हल्ला करून प्रतिकाराचा संदेश दिला. इराणमध्ये Gen-Z युवकांचे आंदोलन हे केवळ आर्थिक संकटाविरोधात नसून स्वातंत्र्य, न्याय आणि मानवी हक्कांसाठीची लढाई आहे.
तेहरानमधील बेहेश्ती, खाजेह नासिर, शरीफ, अमीर कबीर, सायन्स अँड कल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. इस्फहान युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्येही आंदोलन पेटले. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील असमानता, वाढती महागाई आणि रोजगाराच्या संधींचा अभाव यावर तीव्र नाराजी व्यक्त केली