भारतीयांकडे देशाच्या GDP पेक्षाही जास्त सोने
मुंबई, दि. २९ : भारतीयांचे सोने प्रेम हा जगभरात नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरतो. सामान्यातील सामान्य भारतीय देखील अडीनडीला उपयोगी पडेल म्हणून थोडेतरी सोने खरेदी करत असतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भारतीयांच्या घरामध्ये देशाच्या GDP पेक्षाही अधिक सोने असल्याची माहिती समोर आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यामुळे भारतीय कुटुंबांकडे असलेल्या एकूण सोन्याचे मूल्य 5 ट्रिलियन डॉलर (₹450 लाख कोटी) च्या पुढे गेले आहे. हा आकडा देशाच्या एकूण जीडीपी (4.1 ट्रिलियन डॉलर) पेक्षाही जास्त आहे. इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंग्सचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनोरंजन शर्मा यांच्या मते, ही तुलना खूपच रंजक आहे. ते म्हणाले, ‘जीडीपी हे एक फ्लो व्हेरिएबल म्हणजे सतत बदलणारे आहे, तर सोन्याची होल्डिंग (साठा) एक स्टॉक आहे.
मॉर्गन स्टॅनलीच्या एका अहवालानुसार, भारतीय घरांमध्ये सुमारे 34,600 टन सोने जमा आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 4,500 डॉलर प्रति औंस (₹1,42,700 प्रति 10 ग्रॅम) च्या वर व्यापार करत आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार, भारताचा जीडीपी सध्या सुमारे 4.1 ट्रिलियन डॉलर (सुमारे ₹370 लाख कोटी) आहे. म्हणजेच, जर भारतातील घरांमध्ये ठेवलेल्या सोन्याचे एकूण मूल्य पाहिले, तर ते देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षाही अधिक मौल्यवान आहे.