‘दृश्यम 3’ मध्ये अक्षय खन्नाच्या जागी दिसणार हा अभिनेता
मुंबई, दि. 29 : तब्बू, अज देवगण, अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयामुळे गाजलेला थरारपट दृश्यम चा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दृश्यम मध्ये पोलीस अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका करणारा आणि सध्या सर्वत्र चर्चेत असलेला अभिनेता अक्षय खन्ना मात्र दृश्यम ३ मध्ये दिसणार नाही.
‘दृश्यम 3’ चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नावर गंभीर आरोप करत त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चित्रपट सुरू होण्याच्या अवघ्या 10 दिवस आधी अक्षयने या प्रोजेक्टमधून माघार घेतल्याने निर्माते संतापले असून त्यांनी आता त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची निवड केली आहे. अक्षय खन्नाच्या या वागणुकीनंतर निर्मात्यांनी तातडीने ‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतला चित्रपटात घेतले आहे. कुमार मंगत यांनी सांगितले की, “जयदीप हा एक प्रगल्भ अभिनेता आणि अतिशय चांगला माणूस आहे. त्याच्या येण्याने चित्रपटाचे काम आता पुन्हा रुळावर आले आहे. आम्ही त्याच्या भूमिकेत काही खास बदल केले आहेत, जे प्रेक्षकांसाठी सुखद धक्का असतील.”
अक्षयने ऐनवेळी चित्रपट सोडल्यामुळे जे आर्थिक नुकसान झाले, त्यासाठी आता कोर्टात नुकसान भरपाई मागितली जाणार आहे. निर्माते कुमार मंगत पाठक यांच्या मते, अक्षय खन्नाने रीतसर करार केला होता आणि त्यासाठी आगाऊ मानधनही घेतले होते. मात्र, शूटिंग सुरू होण्यापूर्वी त्याने अचानक असहकार्य करण्यास सुरुवात केली. चित्रपटाच्या कथेनुसार त्याला विग न वापरता नैसर्गिक लूक द्यायचा होता, ज्याला त्याने आधी संमती दिली होती.
परंतु, नंतर त्याने आपला निर्णय बदलला आणि निर्मात्यांशी संवाद साधणे बंद केले. ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षयने फोन आणि मेसेजला उत्तरे देणे टाळले, ज्यामुळे निर्मात्यांना कायदेशीर पाऊल उचलावे लागले.
SL/ML/SL