प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची सखोल माहिती असणे आवश्यक

 प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची सखोल माहिती असणे आवश्यक

मुंबई प्रतिनिधी

निवडणूक कामकाजात पारदर्शकता व शिस्त यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया अचूक, पारदर्शक व कोणत्याही प्रकारच्या त्रुटीशिवाय पार पडणे अत्यावश्यक आहे. यासाठी ईव्हीएमची योग्य हाताळणी, मॉक पोलची कार्यपद्धती, मतदान साहित्याचे व्यवस्थापन, तसेच मतदानानंतरची कार्यवाही या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती असणे व त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक व सखोल प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. महानगरपालिकेतर्फे दिनांक २९ डिसेंबर २०२५ ते दिनांक ९ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित केलेल्‍या प्रशिक्षणाला जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांची नावे त्वरित महानगरपालिका निवडणूक विभागाला कळवावीत. त्यांच्याविरोधात फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाणार आहे, असे सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्‍वास शंकरवार यांनी सांगितले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने अधिकारी – कर्मचा-यांना महानगरपालिका कार्यक्षेत्रात सात विविध ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ ते शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ आणि सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ ते शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रक्रियेत सहभागी अधिकारी – कर्मचा-यांची बैठक आज, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका मुख्‍यालयातील समिती सभागृहात पार पडली. त्‍यावेळी श्री. शंकरवार बोलत होते.

विशेष कार्य अधिकारी श्री. विजय बालमवार, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) श्री. गजानन बेल्‍लाळे, उप जिल्‍हाधिकारी श्रीमती अंजली भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्‍वास शंकरवार म्‍हणाले की, मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी हे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा कणा असतात. त्यांच्या दक्षतेवर, समन्वयावर आणि निर्णय क्षमतेवर संपूर्ण मतदान प्रक्रियेची विश्वासार्हता अवलंबून असते. त्यामुळे प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहून प्रत्येकाने आपली भूमिका, जबाबदारी आणि अधिकार स्पष्टपणे समजून घ्यावेत, जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणताही संभ्रम किंवा अडथळा निर्माण होणार नाही.

विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार म्‍हणाले की, प्रशिक्षण सत्रात संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी राबविण्यात येणाऱया संपूर्ण मतदान प्रक्रियेचे सखोल व टप्पानिहाय तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) ओळख करून देण्यात येऊन बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांची अचूक हाताळणी, परस्पर जोडणी तसेच त्यांची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात येईल. मतदान सुरू करण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या मॉक पोलची संपूर्ण प्रक्रिया, त्याची नोंदणी, तसेच मॉक पोलनंतर यंत्रे सील करण्याची कार्यवाही सविस्तरपणे समजावून सांगण्यात येईल.

माननीय राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांच्या मार्गदर्शक सूचना, टपाली मतदानाची अंमलबजावणी व त्यासंदर्भातील जबाबदाऱ्या याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहणे अधिकारी, कर्मचारी यांना बंधनकारक आहे. प्रशिक्षणात अनुपस्थित राहणाऱ्या किंवा आदेशांचे पालन न करणाऱया अधिकारी व कर्मचारी यांच्‍याविरोधात माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा बैठकीत पुन्‍हा एकदा देण्यात आला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *