नवजात बाळांना चोरणारी टोळी जेरबंद
बदलापूर, दि. २६ : ठाणे जिल्ह्यात मानवी तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं असून पोलिसांनी ७ दिवसांच्या नवजात बाळाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (AHTC) मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बदलापूर पश्चिमेतील एका हॉटेलजवळ सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहकाद्वारे व्यवहाराची खात्री करून पोलिसांनी आरोपींना पकडलं.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शंकर संभाजी मनोहर (३६), रेश्मा शेख (३५), नितीन मनोहर (३३), शेखर जाधव (३५) आणि आसिफ खान (२७) यांचा समावेश आहे. आरोपींनी आधी २० हजार रुपये UPI द्वारे घेतले होते, तर उर्वरित ५.८० लाख रुपये रोख स्वरूपात घेण्याचं ठरवलं होतं. या प्रकरणातील सहावी आरोपी सबिना फरार असून तिचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार हे एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता असून अपत्यहीन जोडप्यांना बाळ विक्री केली जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणात काही रुग्णालये किंवा नर्सिंग होम्सचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. सध्या नवजात बाळाला सरकारी निगा केंद्रात ठेवण्यात आले असून त्याच्या आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे.