ठाणे शहरात बिबट्याची दहशत
ठाणे,दि. २६ : महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पुणे, अहमदनगर, रायगड तसेच भायंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या दिसल्याने ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक २ येथील बेथनी हॉस्पिटलच्या मागील परिसरात बिबट्या सदृश प्राणी फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात दहशत पसरली असून वर्तकनगर पोलीस व वनविभाग तातडीने सक्रिय झाले आहेत.
ठाणे वन विभागाचे अधिकारी नरेंद्र मुठे यांनी सांगितले की, घटनेनंतर परिसरात दक्षता वाढवण्यात आली आहे. बिबट्यांची उपस्थिती निश्चित करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले असून वनविभागाचे पथक सतत गस्त घालत आहे. रहिवाशांना घाबरू नका असे आश्वासन देण्यात आले आहे तसेच जर कोणी बिबट्या पाहिला तर त्वरित वनविभाग किंवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, वनविभागाने नागरिकांना काही महत्त्वाचे नियम पाळण्याचे निर्देश दिले आहेत –
- रात्री उशिरा एकटे बाहेर पडू नये.
- लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये.
- कचरा व अन्नाचे अवशेष उघड्यावर टाकू नयेत, कारण त्यामुळे वन्य प्राणी आकर्षित होतात.
- बिबट्या दिसल्यास त्याला उचकावू नये किंवा पाठलाग करू नये.
वन्य जीव आणि माणसांमधील संघर्ष वाढत असल्याने वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते, जंगलातील अधिवास कमी होत असल्याने बिबटे अन्न व पाण्याच्या शोधात शहरी भागात शिरत आहेत. ठाण्यातील ही घटना त्याचाच भाग असल्याचे मानले जात आहे.