या पेयांना चहा म्हणून नका – FASSAI चे निर्देश
नवी दिल्ली, दि. 26 : अन्न सुरक्षा नियामकाने (FSSAI) चहासंदर्भात एक नवा आदेश जारी केला आहे. कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून प्राप्त झालेल्या पेयांनाच ‘चहा’ म्हणून लेबल केले जाऊ शकते, उदा. ब्लॅक टी, ग्रीन टी, कांग्रा टी किंवा इन्स्टंट टी! हर्बल इन्फ्यूजन, फ्लॉवर-आधारित किंवा इतर वनस्पती-आधारित पेये जसे की कॅमोमाइल, पेपरमिंट किंवा आले यांना ‘चहा’ म्हणून ब्रँड करणे बंद करावे लागेल. असं करणं मिसब्रँडिंग मानले जाईल. हल्ली सरसकट सगळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चहा’ ऐवजी अशा गोष्टींसाठी ‘हर्बल इन्फ्यूजन’ किंवा तत्सम नावाने वर्गीकृत करावे असे आदेश देण्यात आले आहेत.
24 डिसेंबर रोजीच्या सूचनेत, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) इशारा दिला आहे की हर्बल किंवा फुलांवर आधारित इन्फ्युजनला ‘चहा’ म्हणून लेबल करणे चुकीचे ब्रँडिंग आहे. या आदेशात ‘रुइबोस टी’, ‘हर्बल टी’,आणि ‘फ्लॉवर टी’ सारख्या सामान्य बाजारपेठेत लोकप्रीय झालेल्या शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत उत्पादनात जागतिक मानकांनुसार परिभाषित केलेल्या विशिष्ट सदाहरित कॅमेलिया सायनेन्सिस झुडपांची पाने नसतील तोपर्यंत त्याला चहा म्हणता येणार नाही. हे नवे नियम भारतातील चहा उद्योगाला मजबूत करण्यासाठी आणि जागतिक मानकांशी जुळवून घेण्यासाठी आहेत.
जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठा चहा उत्पादक असलेल्या भारतात हे पाऊल मिसब्रँडिंग रोखण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. या निर्णामुळे पारंपरिक चहा उत्पादनांना फायदा होणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने व्यवसायांना लेबल अपडेट करण्यासाठी वेळ दिला आहे.