उपचारांसाठी तब्बल 8 तास प्रतीक्षा, भारतीय तरुणाचा कॅनडामध्ये मृत्यू
कॅनडामधील एडमंटन शहरात भारतीय वंशाचा ४४ वर्षीय तरुण छातीत दुखत असताना तब्बल आठ तास उपचारासाठी प्रतीक्षा करत राहिला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कॅनडाच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.प्रशांत श्रीकुमार यांना २२ डिसेंबर रोजी कामावर असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांना एडमोंटन येथील ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार 3 मुलांचे वडील असलेल्या श्रीकुमार यांना रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षाच्या वेटिंग रूममध्ये आठ तासांहून अधिक काळ ठेवण्यात आले होते.
त्यांच्या वडिलांनी सांगितले की, “ प्रशांतचे छातीत दुखणे वाढतच गेले. आठ तासांहून अधिक काळ वाट पाहिल्यानंतर अखेर त्याला उपचारांसाठी बोलावण्यात आले. “जवळपास 10 सेकंद बसल्यानंतर, त्यांने माझ्याकडे पाहिले, उठला आणि आपला हात छातीवर ठेवला आणि अचानक कोसळला.” नर्सना मदतीसाठी बोलावले आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप उशीर झाला होता. प्रशांत श्रीकुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि तीन मुले आहेत.
कॅनडामध्ये आपत्कालीन विभागात रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते, ही समस्या नवीन नाही. मात्र, ८ तास प्रतीक्षा करून रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. स्थानिक मीडिया आणि भारतीय समुदायाने या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. भारतीय समुदायाकडून आरोग्य सेवेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे. कॅनडातील भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीती आणि असंतोष निर्माण झाला आहे.