शौचालय वापराचे स्वयंप्रमाणपत्र द्या – निवडणूक आयोगाची अजब मागणी
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवार प्रचाराच्या धावपळीतही आहेत. पण यावेळी निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून अर्जासोबत एक भन्नाट दाखला मागीतला आहे. आयोगाने सांगितले आहे – “तुमच्या घरात शौचालय आहे आणि तुम्ही ते वापरता” याचे स्वयंप्रमाणपत्र द्या! घरात शौचालय आहे का? नसल्यास तो सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो, का याची माहिती आयोगाने मागवली आहे. निवडणूक लढवणे आणि शौचालयाचा वापर करणे याचा काय संबंध, असा सवाल करत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
म्हणजे निवडणूक लढवायची असेल तर आधी ‘टॉयलेट टेस्ट’ पास करावी लागणार. शासन एकीकडे शहरे हगणदारी मुक्त झाल्याचा दावा करते आणि दुसरीकडे असे दाखले मागते याचाच अर्थ शासनाला स्वत:बद्दल विश्वास नाही, असे एक इच्छुक उमेदावर राजेंद्र ढगे यांनी सांगितले.काही उमेदवार तर म्हणाले – “आम्ही सुशिक्षित आहोत, उघड्यावर बसायला वेळ कुठे आहे? पण हे लिहून द्यायचं म्हणजे थोडं लाजिरवाणं वाटतं.”